
Australia vs England: चॅम्पियन्स ट्रॉफी २५ स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला ५ विकेट्सने पराभूत केले. शनिवारी (२२ फेब्रुवारी) लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात ७०० हून अधिक धावांचा पाऊस पडला. त्यामुळे या सामन्यात मोठे विश्वविक्रमही नोंदवले गेले.
इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात ८ बाद ३५१ धावा केल्या होत्या. इंग्लंडकडून १४३ चेंडूत बेन डकेटने १६५ धावांची खेळी केली. तसेच त्याने जो रुटसोबत १५४ धावांची भागीदारीही केली. जो रुटने ६८ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून बेन ड्वारशुईने ३ विकेट्स घेतल्या.
त्यानंतर ३५२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग ऑस्ट्रेलियाने ४७.३ षटकात ५ विकेट्स गमावत ३५६ धावा करून पूर्ण केला.
ऑस्ट्रेलियाकडून जोश इंग्लिसने ८६ चेंडूत ८ चौकार आणि ६ षटकारांसह १२० धावांची खेळी केली. तसेच मॅथ्यू शॉर्टने ६३ आणि ऍलेक्स कॅरेने ६९ धावांची अर्धशतकी खेळी केली. मार्नस लॅबुशेनने ४७ धावा केल्या. इंग्लंडकडून पाच गोलंदाजांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.