
वूमन्स प्रीमियर लीग २०२५ स्पर्धा आता अखेरच्या टप्प्यात आहे. या स्पर्धेतील १७ वा सामना सामना गुजरात जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात शुक्रवारी लखनौमध्ये खेळला गेला. या सामन्यात गुजरात जायंट्स संघाने ५ विकेट्सने विजय मिळवला आहे.
दिल्लीने यापूर्वीच या स्पर्धेच्या प्लेऑफमध्ये स्थान मिळवले आहे. हा दिल्लीचा अखेरचा साखळी सामना होता. त्यांनी १० गुण मिळवले आहेत. पण प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी गुजरातसाठी हा विजय अत्यंत महत्त्वाचा होता.
गुजरातने विजय मिळवल्याने त्यांचे आता ७ सामन्यात ८ गुण झाले असून त्यांनी गुणतालिकेत दिल्लीपाठोपाठ दुसरे स्थान मिळवले असून मुंबई इंडियन्सला मागे टाकले आहे. गुजरातला अद्याप एक सामना आणि मुंबईचे दोन साखळी सामने बाकी आहेत.