
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेत भारतीय संघाने अंतिम सामन्यात स्थान मिळवलं आहे. मंगळवारी (४ मार्च) दुबईत झालेल्या उपांत्य सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला ४ विकेट्सने पराभूत करत सलग तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीची अंतिम फेरी गाठली.
यापूर्वी भारताने २०१३ आणि २०१७ साली झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यातही स्थान मिळवले होते. २०१३ मध्ये भारत विजयी झाला होता, तर २०१७ मध्ये उपविजेता होता. आता १२ वर्षांनी पुन्हा विजेतेपद मिळवण्याकडे भारताने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे.
भारतासमोर ऑस्ट्रेलियाने विजयासाठी २६५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग भारताने ४८.१ षटकात ६ विकेट्स गमावत पूर्ण केले. भारताकडून विराट कोहलीने अर्धशतकी खेळी केली. त्याला श्रेयस अय्यरचीही चांगली साथ मिळाली.