
Karnataka vs Vidarbha: विजय हजारे ट्रॉफी २०२५ स्पर्धेचे विजेतेपद कर्नाटक संघाने पटकावले. शनिवारी करुण नायरच्या नेतृत्वातील विदर्भा संघाला कर्नाटकने ३६ धावांनी अंतिम सामन्यात पराभूत केलं. यासह कर्नाटकने पाचव्यांदा विजय हजारे ट्रॉफीवर नाव कोरले आहे.
विदर्भाला पहिल्यांदाच हे विजेतेपद जिंकण्याची संधी होती, मात्र त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे. करुण नायरसाठी शनिवारचा संपूर्ण दिवसच निराशाजनक राहिला.
या स्पर्धेत त्याने सर्वाधिक धावा केल्या, मात्र अंतिम सामन्यात तो स्वस्तात बाद झाला. त्याआधी त्याला चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेसाठी भारतीय संघातही संधी मिळाली नाही.
यानंतर त्याची कर्णधार म्हणून जेतेपद मिळण्याची संधीही हुकली. पण विजय हजारे स्पर्धेच्या अंतिम सामन्यात विदर्भासाठी ध्रुव शोरे मात्र शतक करून चमकला. मात्र, संघ पराभूत झाल्याने त्याचे हे शतक व्यर्थ ठरले. परंतु असे असले, तरी वैयक्तिक काही विक्रम त्याने नावावर केले आहेत.