
वूमन्स प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत मुंबई इंडियन्स अंतिम फेरीत स्थान मिळवणारा दुसरा संघ ठरला आहे. मुंबईने गुरुवारी (१३ मार्च) एलिमिनेटर सामन्यात गुजरात जायंट्स संघाला ४७ धावांनी पराभूत केले आहे. त्यामुळे आता मुंबई इंडियन्स दुसऱ्यांदा वूमन्स प्रीमियर लीगचा अंतिम सामना गाठला आहे. आता अंतिम सामन्यात मुंबईचा सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणार आहे.
विशेष म्हणजे वूमन्स प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामात म्हणजे २०२३ मध्ये अंतिम सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन संघात झाला होता. त्यामुळे मुंबईने दिल्लीला पराभूत करत विजेतेपद पटकावले होते. आता पुन्हा दोन वर्षांनी अंतिम सामन्यात हे दोन संघच आमने-सामने असणार आहेत.
दिल्लीने सलग तिसऱ्यांदा अंतिम सामन्यात प्रवेश केलेला आहे. पण अद्याप त्यांनी विजेतेपद मिळवलेलं नाही. आता वूमन्स प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेचा अंतिम सामना १५ मार्च रोजी खेळला जाणार आहे.