

R Ashwin Backs Devdutt Padikkal for No. 3 Spot
Sakal
IND vs SL Test series: भारताचा कसोटी संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर असून कसोटी मालिकेतील गॉलला झालेल्या पहिल्या कसोटीत १६५ धावांनी विजय मिळवत १-० अशी आघाडीही घेतली आहे. या मालिकेला साई सुदर्शन दुखापतीमुळे मुकला आहे. तो गेल्या काही सामन्यांमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज म्हणून भारतीय संघव्यवस्थापनाची पसंती राहिला आहे. पण तो दुखापतीने बाहेर झाल्याने त्याच्या जागेवर तिसऱ्या क्रमांकावर देवदत्त पडिक्कलला गॉलमध्ये खेळवण्यात आले.
पडिक्कलनेही (Devdutt Padikkal) आपले नाणे खणखणीत वाजवले आणि पहिल्या डावात १६७ धावांची, तर दुसऱ्या डावात ४४ धावांची खेळी केली. त्यामुळे त्याने सामनावीर पुरस्कारही जिंकला. अशात आता या कसोटी मालिकेनंतर नोव्हेंबरमध्ये भारतीय संघाला न्यूझीलंडमध्ये कसोटी मालिका खेळायची आहे, त्यावेळी सुदर्शनचे पुनरागमन होण्याची शक्यता आहे. त्यावेळी पुन्हा एकदा त्यांच्यापैकी कोणाला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवायचे असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. याबाबत आता भारताचा माजी फिरकीपटू आर अश्विनने (R Ashwin) भाष्य केले आहे.