
शनिवारी (२४ मे) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) मोठी घोषणा केली. २५ वर्षीय स्टार क्रिकेटपटू शुभमन गिल याला भारतीय कसोटी संघाचा कर्णधार करण्यात आलं आहे. भारतीय निवड समितीने शनिवारी आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या कसोटी संघाची घोषणा केली.
यावेळी त्यांनी गिलकडे कर्णधारपद सोपवले आहे. त्यामुळे आता शुभमन गिल नवा कसोटी कर्णधार असणार आहे. तो रोहित शर्माची जागा घेईल. गिलसमोर पहिलेच आव्हान इंग्लंड दौऱ्यात होणारी ५ सामन्यांची कसोटी मालिका आहे. इतकेच नाही, तर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या कसोटी निवृत्तीनंतर संघाचे नेतृत्व करण्याचे मोठे आव्हान त्याच्यासमोर असेल.