
दक्षिण आफ्रिका संघाने अखेर चोकर्सचा टॅग पुसला अन् कसोटीचे विश्वविजेतेपद जिंकलं आहे. शनिवारी (१४ जून) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२३-२५ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला ५ विकेट्सने पराभूत केले.
लॉर्ड्स क्रिकेट मैदानात मिळवलेल्या या विजयासह तेंबा बावूमाच्या नेतृत्वातील दक्षिण आफ्रिकेने २७ वर्षांचा आयसीसी विजेतेपदाचा दुष्काळ संपवला. दक्षिण आफ्रिकेने १९९८ नंतर पहिल्यांदाच आयसीसी ट्रॉफी जिंकली आहे. यापूर्वी १९९८ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी दक्षिण आफ्रिकेने जिंकली होती.
दक्षिण आफ्रिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप जिंकणारा तिसरा संघ ठरला. यापूर्वी २०२१ मध्ये न्यूझीलंडने आणि २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियाने विजेतेपद जिंकले होते.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्याचा शनिवारी चौथा दिवस होता. चौथ्या दिवशी दक्षिण आफ्रिलेला विजयासाठी ६९ धावांचीच गरज होती, तर ऑस्ट्रेलियाला ८ विकेट्सची गरज होती. एडेन मार्करम शतक करून, तर कर्णधार तेंबा बाऊमा अर्धशतकासह नाबाद होता. दक्षिण आफ्रिकेने शनिवारी या ६९ धावा पूर्ण करत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.