
तामिळनाडू प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेदरम्यान खळबळ उडाली आहे. भारताचा माजी फिरकीपटू आर अश्विन आणि तो कर्णधार असलेल्या दिंडिगुल ड्रॅगन्स संघावर चेंडू छेडछाड करण्याचा आरोप प्रतिस्पर्धी संघ सियाचेम मदुराई पँथर्सने केला आहे.
त्यांनी याबाबत अधिकृत तक्रारही केली आहे. त्यामुळे आता याबाबत चौकशी सुरू झाली आहे. या स्पर्धेत सालेममध्ये १४ जून रोजी मदुराई आणि दिंडिगुल संघात सामना झाला होता. या सामन्यात दिंडिगुल संघाने ९ विकेट्सने विजय मिळवला होता.
१४ जून रोजी झालेल्या सामन्यात दिंडिगुल संघाने आयोजकांकडून चेंडू पुसण्यासाठी देण्यात आलेल्या टॉवेलने चेंडूशी छेडछाड केली असल्याचा आरोप मदुराई संघाने केला आहे. त्यांनी म्हटलं की त्या टॉवेलमार्फत एक प्रकारचे केमिकल वापरण्यात आले, ज्यामुळे चेंडू जड झाला आणि जेव्हा तो बॅटवर येत होता, तेव्हा त्याचा टणक आवाज येत होता.