
थोडक्यात :
१४ वर्षीय वैभव सूर्यवंशीने दुसऱ्या डावात ५६ धावांची तुफानी खेळी करत इंग्लंडवर दडपण आणलं.
भारत अंडर १९ संघाने चौथ्या दिवशी पावसामुळे खेळ थांबला तोपर्यंत ३५.४ षटकांत ४ बाद १७१ धावा करत २७२ धावांची आघाडी घेतली आहे.
पहिल्या डावात भारताकडून आयुष म्हात्रे, विहान मल्होत्रा, आणि इतरांनी शानदार फलंदाजी केली.
भारताचा १९ वर्षांखालील संघ देखील सध्या इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिला सामना बेकेनहॅमला सुरू असून भारतीय संघ १९ वर्षांखालील इंग्लंड संघावर वर्चस्व राखून आहे. या सामन्यात दुसऱ्या दिवशी १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने गोलंदाजीत कमाल केली होती. त्यानंतर तिसऱ्या दिवशी त्याने त्याच्या बॅटने इंग्लंडवर प्रहार केला आहे.
या सामन्यात तिसऱ्या दिवशी भारतीय संघ दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरला. यावेळी आयुष म्हात्रे आणि वैभव सूर्यवंशी यांनी सलामीला दमदार सुरुवात केली. त्यांनी सलामीला ७७ धावांची भागीदारी केली. कर्णधार आयुष ३२ धावांवर बाद झाला. पण वैभव आक्रमक खेळत होता.