
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचा दुसरा उपांत्य सामना न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात बुधवारी (५ मार्च) खेळवला जात आहे. लाहोरच्या गद्दाफी स्टेडयमवर हा सामना खेळवला जात आहे. या सामन्यात न्यूझीलंडकडून २५ वर्षीय रचिन रविंद्रने शतक साजरे केले, तर केन विलियम्सननेही त्याची भक्कम साथ देताना शतक केले.
या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. न्यूझीलंडकडून सलामीवीर विल यंग आणि रचिनने चांगली सुरुवात केली होती. पण विल यंगला लुंगी एनगीडीने २१ धावांवर बाद केले. पण त्यानंतर रचिनला विलियम्सनची साथ मिळाली.
या दोघांनी मिळून विक्रमी दीडशतकी भागीदारीही केली. या भागीदारीदरम्यान रचिनने ९३ चेंडूच त्याचे शतक पूर्ण केले. हे त्याचे वनडे कारकिर्दीतील पाचवे शतक आहे. विशेष म्हणजे ही पाचही शतके त्याने आयसीसी स्पर्धेत खेळताना केली आहेत. त्याने यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील हे एकूण दुसरे शतक आहे.