
वूमन्स प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेचा अखेरचा साखळी सामना मंगळवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात पार पडला. मुंबईला झालेल्या या सामन्यात गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ११ धावांनी विजय मिळवत स्पर्धेचा शेवट गोड केला. बंगळुरूचे आव्हान यापूर्वीच संपले आहे.
पण मुंबईला हा सामना जिंकून पाँइंट्स टेबलमध्ये अव्वल क्रमांक मिळवण्यासोबतच थेट अंतिम सामना खेळण्याची संधी होती. मात्र, आता या सामन्यातील पराभवामुळे मुंबई इंडियन्स दुसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत. पहिल्या क्रमांकावर दिल्ली कॅपिटल्स आहे. ते आता थेट अंतिम सामना खेळतील, तर मुंबई गुजरात जायंट्स संघाविरुद्ध एलिमिनेटर सामना खेळतील.