
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या तिसऱ्या पर्वाचा बहुप्रतिक्षित अंतिम सामना बुधवारपासून खेळवला जाणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२३-२५ स्पर्धेच्या पाँइंट्स टेबलमध्ये अव्वल दोन क्रमांकावर राहिलेले दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया संघात हा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. हा सामना लॉर्ड्सवर होणार असून आता विजेतेपद कोण मिळवणार याची सर्वांना उत्सुकता आहे.
ऑस्ट्रेलिया त्यांचे विजेतेपद राखण्यासाठी या अंतिम सामन्यात खेळणार आहे. त्यांनी २०२३ मध्ये भारताला अंतिम सामन्यात पराभूत करत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या दुसऱ्या पर्वाचे विजेतेपद जिंकले होते.
तसेच दक्षिण आफ्रिका पहिल्यांदाच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना खेळणार असून ते वरिष्ठ स्थरावर पहिले आयसीसी विजेतेपद मिळवण्यासाठी खेळणार आहेत. ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व पॅट कमिन्स आणि दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व तेंबा बवूमा करणार आहे.