PAK vs ENG : इंग्लंडने 14.4 षटकातच पार केले टार्गेट! पहिल्या सराव सामन्यात पाकची बॉलिंग फेल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

England Defeat Pakistan In First Warm Up Game

PAK vs ENG : इंग्लंडने 14.4 षटकातच पार केले टार्गेट! पहिल्या सराव सामन्यात पाकची बॉलिंग फेल

Pakistan vs England Warm Up Game : भारत आणि पाकिस्तान या दोन्ही कट्टर प्रतिस्पर्ध्यांचे आज सराव सामने झाले. भारताने गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला मात देत विजयी सुरूवात केली. तर पाकिस्तानला इंग्लंडकडून पराभव सहन करावा लागला. पावसामुळे सामना 19 षटकांचा करण्यात आला होता. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम पाकिस्तानला फलंदाजीसाठी पाचारण केले. पाकिस्तानला 19 षटकात 8 बाद 160 धावांपर्यंतच मजल मारता आली. इंग्लंडने पाकिस्तानचे हे आव्हान 14.4 षटकात 4 फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. इंग्लंडने पाकिस्तानच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली.

हेही वाचा: Mamata Banerjee : गांगुलीसाठी ममतांची बॅटिंग; थेट पंतप्रधानांकडे केली 'ही' मागणी

प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानने आक्रमक सुरूवात करत पहिल्या 10 षटकात 90 धावांचा टप्पा पार केला होता. मात्र इंग्लंडने त्यानंतर पाकिस्तानला पाठोपाठ धक्के दिल्याने त्यांची पुढच्या 10 षटकातील धावगती मंदावली. पाकिस्तानची अवस्था 3 बाद 96 वरून 5 बाद 107 धावा अशी झाली. पाकिस्तान या धक्क्यातून सावरलाच नाही. इंग्लंडने पाकिस्तानच्या कोणत्या जोडीला मोठा भागीदारी रचू दिली नाही. अखेर पाकिस्तानचा डाव 19 षटकात 8 बाद 160 धावांवर संपुष्टात आला. पाकिस्तानकडून सलामीवीर मकसूदने 22 चेंडूत 39 धावांची खेळी केली. इफ्तिकार अहमदने 22 तर मोहम्मद वसिमने 16 चेंडूत 26 धावांची खेळी केली. इंग्लंडकडून विलीने सर्वाधिक 2 षटकात 2 बळी घेतले. पाकिस्ताचे दोन स्टार फलंदाज बाबर आझम आणि मोईन अली यांनी विश्रांती देण्यात आली.

हेही वाचा: T20 World Cup : भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यात पाकिस्तानचाही अभ्यास, Photo व्हायरल

दरम्यान, इंग्लंड ज्यावेळी पाकिस्तानच्या या 161 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला त्यावेळी त्यांची सुरूवात खराब झाली. सलामीवीर फिलिप सॉल्ट 1 धाव करून माघारी फिरला. त्यानंतर बेन स्टोक्समने पॉवर प्लेमध्ये 18 चेंडूत 36 धावांची आक्रमक खेळी करत धावगती वाढवली. मात्र मोहम्मद वसिमने त्याला पॉवर प्लेच्या शेवटच्या षटकात बाद केले. स्टोक्स बाद झाल्यानंतर पुढच्याच षटकात अॅलेक्स हेल्स 9 धावांची भर घालून माघारी फिरला.

दरम्यान, लिम लिव्हिंगस्टोन आणि हॅरी ब्रुक्स यांनी इंग्लंडला 10 व्या षटकात शतक पार करून दिले. मात्र मोहम्मद वसिमनेच लिव्हिगस्टोनला 28 धावांवर बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर आलेल्या सॅम करनने आपला दानपट्टा सुरू केला. करन आणि ब्रुक्सने 14 पाकिस्तानचे आव्हान 14.4 षटकातच पार केले. ब्रुक्सने 24 चेंडूत नाबाद 45 धावा केल्या. तर सॅम करनने 14 चेंडूत नाबाद 33 धावा केल्या.

हेही वाचा: Mohammed Shami : 'हा असा यॉर्कर टाकायचा!' गुरू शमी अन् शिष्य आफ्रिदीचा फोटो होतोय व्हायरल

दुखापतीतून सावरलेला पाकिस्तानचा स्टार गोलंदाज शाहीन आफ्रिदी कशी गोलंदाजी याची सर्वांना उत्सुकता होती. त्याने फक्त दोन षटके गोलंदाजी केली. त्यात त्याला विकेट मिळवण्यात यश आले नाही. मात्र त्याने फक्त 7 धावा दिल्या. दुसऱ्या बाजूला मोहम्मद वसिम वगळता इतर गोलंदाजांची चांगलीच धुलाई झाली. मोहम्मद वसिमने 2.4 षटकात 16 धावा देत 2 बळी टिपले.