esakal | IND vs ENG Day 3 : पिछाडीवरुन टीम इंडियाची पुन्हा एकदा आघाडी
sakal

बोलून बातमी शोधा

IND vs ENG

IND vs ENG Day 3 : पिछाडीवरुन टीम इंडियाची पुन्हा एकदा आघाडी

sakal_logo
By
सुशांत जाधव

England vs India 4th Test Day 3 : सलामीवीर रोहित शर्माच्या धमाकेदार शतकाच्या जोरावर भारतीय संघाने सामन्यात पुन्हा दमदार कमबॅक केले. अंधुक प्रकाशामुळे खेळ थांबवण्यात आला त्यावेळी टीम इंडियाने 3 गड्यांच्या मोबदल्यात 270 धावा करत सामन्यात 171 धावांची आघाडी घेतली होती. विराट कोहली 22 (37) आणि रविंद्र जडेजा 9 (33) धावांवर खेळत होते.

लंडन येथील ओव्हलच्या मैदानात सुरु असलेल्या चौथ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी रोहित शर्मा आणि लोकेश राहुल जोडीनं बिन बाद 43 धावांवरुन खेळाला सुरुवात केली. धावफलकावर 83 धावा असताना लोकेश राहुलच्या रुपात जेम्स अँडरसनने टीम इंडियाला पहिला धक्का दिला. 101 चेंडू खेळणाऱ्या लोकेश राहुलने 46 धावा केल्या. आपल्या खेळीत त्याने 6 चौकार आणि 4 चौकार खेचले. त्याचे अर्धशतक अवघ्या 4 धावांनी हुकले. त्यानंतर रोहित शर्माने पुजाराच्या साथीने इंग्लंडच्या गोलंदाजांचे खांदे पाडले.

हेही वाचा: VIDEO : हिटमॅननं तोऱ्यात साजरी केली परदेशातील पहिली सेंच्युरी!

या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 153 धावांची भागीदारी केली. दरम्यान रोहित शर्माने परदेशात पहिले वहिले शतक पूर्ण केले. 256 चेंडूचा सामना करताना रोहित शर्माने 14 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 127 धावा केल्या. ओली रॉबिन्सनने रोहितच्या खेळीला ब्रेक लावला. त्याच्यापाठोपाठ पुजाराही चालता झाला. त्याची विकेटही रॉबिन्सननेच घेतली. त्याने 127 चेंडूंचा सामना करताना 61 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत 9 चौकारांचा समावेश होता.

हेही वाचा: IND vs ENG : टीम इंडिया पिछाडीवरुन धमाका करण्यात माहिर; पण...

विराट कोहलीने पुन्हा एकदा अजिंक्यच्या जागी रविंद्र जडेजाला बढती दिल्याचे पाहायला मिळाले. या जोडीने 33 धावांची भागीदारी केली असून तिसऱ्या दिवसाअखेर ते नाबाद खेळत होते. अंधुक प्रकाशामुळे निर्धारित वेळेपूर्वी खेळ थांबवण्यात आला.

पहिल्या डावात भारतीय संघ अवघ्या 178 धावांत आटोपला होता. इंग्लंडने पहिल्या डावात 290 धावा करुन 99 धावांची आघाडी घेतली. इंग्लंडकडे आघाडी असताना टीम इंडिया बॅकफूटवर होती. पण मागील काही वर्षांतील इतिहासाची पुनरावृत्ती करत टीम इंडियाने पुन्हा धमाक्यात कमबॅक केले. चौथ्या कसोटी सामन्यातील दोन दिवस बाकी असून भारतीय संघ चौथ्या दिवशी किती धावा करणार? इंग्लंडसमोर आव्हानात्मक धावसंख्या ठेवण्यात कोणता खेळाडू पुढील दिवस गाजवणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. मागील काही सामन्यांपासून टीम इंडिया पिछाडीवरुन आघाडी मिळवून दमदार विजय नोंदवताना पाहायला मिळाले. याच इतिहासाची पुनरावृत्ती करण्यास टीम इंडिया प्रयत्नशील असेल.

loading image
go to top