esakal | फिक्सिंग प्रकरण: हॅटट्रिकच्या किमयागारावर 6 वर्षांची बंदी

बोलून बातमी शोधा

Nuwan Zoysa
फिक्सिंग प्रकरण: हॅटट्रिकच्या किमयागारावर 6 वर्षांची बंदी
sakal_logo
By
टीम ई सकाळ

श्रीलंकन संघाचा माजी जलदगती गोलंदाज आणि कोच नुवान जोएसावर मॅच फिक्सिंग आणि सट्टेबाजासंदर्भातील माहिती लपवून ठेवल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. आयसीसीने त्याच्यावर 6 वर्षांची बंदी घातली आहे. 2017 मध्ये युएईमध्ये रंगलेल्या टी 10 लीग स्पर्धेत श्रीलंका संघाच्या गोलंदाजी कोचची भूमिका निभावत असताना त्याच्यावर भ्रष्टाचारविरोधी आरोप झाले होते. 31 ऑक्टोबर 2018 पासून अस्थायी स्वरुपात निलंबित करण्यात आले होते. आयसीसीने त्याला 6 वर्षांसाठी बॅन केले असून 31ऑक्टोबर 2018 पासून त्याच्यावरील 6 वर्षांच्या बंदीला सुरुवात होईल, असेही आयसीसीने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा: टेन्शन फ्री झाल्यावर विराटने दिला पंत-हेटमायरला दिलासा (VIDEO)

आयसीसी इंटीग्रिटी यूनिटचे जनरल मॅनेजर एलेक्स मार्शल यांनी एका निवेदनाच्या माध्यमातून यासंदर्भातील माहिती दिलीये. एका राष्ट्रीय टीमच्या प्रशिक्षकपदी असताना त्याने आदर्श प्रस्थापित करणे अपेक्षित होते. ही गोष्ट बाजूला ठेवून त्यांनी भ्रष्टाचाराची वाट निवडली. आपल्या टीममधील अन्य सहकाऱ्यांनाही यात ओढण्याचे प्रयत्न केले. मॅच फिक्सिंग आणि भ्रष्टाचार क्रिकेट खेळाच्या सिद्धांताला काळीमा फासण्याचा प्रकार आहे. क्रिकेटमध्ये ही गोष्ट सहन करुन घेतली जाणार नाही, असे मार्शल यांनी म्हटले आहे. श्रीलंका संघाकडून 30 कसोटी आणि 95 वनडे सामने खेळलेल्या 42 वर्षीय जोएसावर 2017 मध्ये यूएईतील टी10 लीग स्पर्धेत भ्रष्टाचाराचे आरोप लागले होते. श्रीलंकेच्या राष्ट्रीय संघाला जोएसा याने गोलंदाजीचे धडेही दिले आहेत.

हेही वाचा: IPL Record: 360 डिग्री एबी ठरला 'फास्टर फॉरेनर'

झोएसाच्या नावे कसोटीत 64 आणि वनडेत 108 विकेट आहेत. कारकिर्दीतील आठव्या कसोटी सामन्यात त्याने हॅटट्रिकचा अनोखा विक्रम आपल्या नावे केला होता. टेस्ट मॅचच्या पहिल्या तीन चेंडूवर त्याने तीन विकेट घेतल्या होत्या. हरारेच्या मैदानात झिम्बाब्वे विरुद्ध 1999 मध्ये त्याने ही कामगिरी केली होती. त्याने ट्रेवोर ग्रीपर, मरे गुडविन आणि नील जॉन्सन यांची शिकार केली होती.