esakal | रमण लांबा ते फिल ह्युजेस... क्रिकेटच्या मैदानात दुखापतीमुळे यांनी गमावला प्राण

बोलून बातमी शोधा

Cricketers-Injury

क्रिकेटच्या मैदानावर अनेकदा काही दुर्दैवी घटनाही घडल्या आहेत.

क्रिकेटच्या मैदानात दुखापतीमुळे यांनी गमावला प्राण

sakal_logo
By
विराज भागवत

क्रिकेट हा अनिश्चिततांचा खेळ आहे. क्रिकेटच्या मैदानावर काहीही घडू शकतं, असं लोक मजेशीर पद्धतीने म्हणतात. पण क्रिकेटच्या मैदानावर अनेकदा काही दुर्दैवी घटनाही घडल्या आहेत. चेंडू लागल्याने खेळाडूंना किंवा पंचांना झालेल्या दुखापतींची अनेक प्रकरणं क्रिकेटच्या मैदानावर पाहायला मिळतात. क्रिकेटच्या इतिहासात मैदानावर दुखापत झाल्यानंतर काही खेळाडूंना आपला जीवदेखील गमवायला लागल्याच्या दु:खद घटना घडल्या आहेत. त्याच घटनांचा आपण आढावा घेऊया...

१. फिल ह्युजेस (ऑस्ट्रेलिया, २५) - २०१४

ऑस्ट्रेलियाचा फलंदाज फिल ह्युजेस हा शेफिल्ड शिल्ड स्पर्धा खेळत होता. त्यावेळी साऊथ ऑस्ट्रेलिया विरूद्ध न्यू साऊथ वेल्स सामन्यात एक बाऊन्सर चेंडू येऊन ह्युजेसच्या डोक्यावर आदळला. त्यामुळे त्याच्या डोक्याच्या आतील भागाला फ्रॅक्चर झाले आणि मेंदूतून प्रचंड रक्तस्त्राव झाला. त्याच्यावर सिडनीच्या हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले पण अखेर दोन दिवसांनी ह्युजेसचा दुर्दैवी मृत्यू झाला.

२. डॅरेन रँडल (साऊथ आफ्रिका, ३२) - २०१३

साऊथ आफ्रिकेतील एका स्थानिक सामन्यात पुल शॉट खेळण्याचा प्रयत्न करताना रँडलच्या डोक्याचा बाजूच्या भागावर चेंडू आदळला होता. चेंडू लागताच तो जमिनीवर कोसळला. त्याला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही. त्याला आपला प्राण गमवावा लागला.

३. झुल्फीकार भट्टी (पाकिस्तान, २२) - २०१३

पाकिस्तानी खेळाडू जुल्फीकार भट्टी हा स्थानिक क्रिकेट सामन्यात फलंदाजी करत असताना त्याच्या छातीवर चेंडू जोरात आदळला. त्याक्षणी तो जमिनीवर पडला. त्या हॉस्पिटलला नेण्यात आले पण उपचाराआधीच त्याला मृत घोषित करण्यात आले.

हेही वाचा: VIDEO : कुणाचं काय तर कुणाचं काय; पोलार्डचे इशारे एकदा पाहाच

४. रिचर्ड बिमाँट (इंग्लंड, ३३) - २०१२

एका क्रिकेट सामन्यात फिल्डिंग करत असताना रिचर्ड बिमाँट अचानक जमिनीवर कोसळला. त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. पण उपचार करण्यापूर्वीच त्याला मृत जाहीर केलं. त्याला फिल्डिंग करताना हृदयविकाराचा झटका आला असावा अशी शक्यता व्यक्त केली गेली.

५. अल्कविन जेनकिन्स (इंग्लंड, ७२) - २००९

पंच अल्कविन जेनकिन्स हे एका लीग सामन्यात अंपायरिंग करत होते. त्यावेळी अचानक फिल्डरने फेकलेला चेंडू त्यांच्या डोक्यावर येऊन आदळला. त्या दुखापतीतू ते सावरू शकले नाहीत आणि त्यांना प्राण गमवावा लागला.

६. वासिम रझा (पाकिस्तान, ५४) - २००६

पाकिस्तानी क्रिकेटर वासिम रझा याचं क्रिकेटच्या मैदानातच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. सरे संघाकडून ५०वर्षांवरील खेळाडूंच्या संघात खेळत असताना बकिंगहमशायर येथे ही घटना घडली.

७. रमण लांबा (भारत, ३८) - १९९८

ढाक्यातील एका क्लब मॅचमध्ये रमण लांबा फिल्डिंग करत असताना फलंदाजाने मारलेला चेंडू त्यांच्या डोक्यावर आदळला. त्यानंतर ते ३ दिवस कोमामध्ये होते. पण अखेर त्यांना मृत घोषित करण्यात आलं.

हेही वाचा: MIvsRR : मुंबई जिंकली; रितिकावर फिरला कॅमेरा (VIDEO)

८. इयन फॉली (इंग्लंड, ३०) - १९९३

देशांतर्गत एका स्पर्धेतील डर्बीशायर विरूद्ध वर्किंग्टन या सामन्यात खेळताना फॉली फलंदाजी करत होते. त्यावेळी चेंडू त्यांच्या डोळ्याच्या खालच्या बाजूला जोरात येऊन आदळला. त्यावेळी ते जमिनीवर कोसळले आणि त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला.

९. विल्फ स्लॅक (इंग्लंड, ३४) - १९८९

गांबियामधील बांजूल येथे एक स्थानिक सामना सुरू असताना स्लॅकचा मृत्यू झाला. त्यांचा ज्या सामन्यात मृत्यू झाला, त्या आधीच्या सामन्यात त्यांच्या डोळ्यापुढे अंधारी येण्याचा प्रकार घडला होता. पण तरीही ते सामना खेळायला उतरले आणि अचानक मैदानावर कोसळून त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी विविध चाचण्या केल्या पण तरीही त्यांना मृत्यूचं कारण समजू शकलं नाही.

१०. अब्दुल अझीज (पाकिस्तान, १८) - १९५९

कराचीमध्ये सुरू असलेल्या एका स्थानिक सामन्यात अझीज फलंदाजी करत होता. त्यावेळी त्याच्या छातीवर चेंडू लागला आणि तो रूग्णालयात पोहोचण्याआधीच प्राण गमावून बसला.

११. अँडी डुकॅट (इंग्लंड, ५६) - १९४२

क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानावर डुकॅट यांना खेळताना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांना जीव गमवावा लागला.

१२. जॉर्ज समर्स (इंग्लंड, २५) - १८७०

नॉटिंगहॅमशायर संघाकडून समर्स लॉर्ड्सच्या मैदानावर MCC विरूद्ध खेळत होता. त्यावेळी फलंदाजी करताना त्याच्या डोक्यावर चेंडू लागला. त्याने ती दुखापत फारशी गांभीर्याने घेतली नाही. त्यामुळे त्याच्यावर उपचार करण्यात आले नाहीत. अखेर चार दिवसांनी त्याला आपले प्राण गमवावे लागले.