esakal | 14 वर्षीय संजनाची दुबईत जलतरणात विक्रमी कामगिरी
sakal

बोलून बातमी शोधा

14 वर्षीय संजनाची दुबईत जलतरणात विक्रमी कामगिरी

चौदा वर्षांच्या संजनाने पहिल्या अॅपेक्स कम्युनिटी खुल्या जलतरण स्पर्धेत चार सुवर्ण व एका रौप्यपदक पटकावलं आहे.

14 वर्षीय संजनाची दुबईत जलतरणात विक्रमी कामगिरी

sakal_logo
By
सूरज यादव

पणजी - गोव्यातील युवा जलतरणपटू संजना प्रभुगावकर हिने संयुक्त अरब अमिरातीतील (यूएई) जलतरण स्पर्धेत विक्रमी कामगिरी नोंदवली आहे. चौदा वर्षांच्या संजनाने पहिल्या अॅपेक्स कम्युनिटी खुल्या जलतरण स्पर्धेत चार सुवर्ण व एका रौप्यपदक पटकावलं आहे. संजना दुबईतील अॅक्वा नेशन स्पोर्टस अकादमीची प्रशिक्षणार्थी असून तिने 100 मीटर बॅकस्ट्रोक शर्यतीत अव्वल वेळ नोंदविताना यूएई नवी विक्रमी कामगिरी केली.

दुबईतील हमदान तरण तलाव क्रीडा संकुलात पार पडलेल्या स्पर्धेत संजनाने 100 मीटर बॅकस्ट्रोक शर्यतीसह 200 मीटर वैयक्तिक मेडल, 200 मीटर बॅकस्ट्रोक आणि 50 मीटर बॅकस्ट्रोक शर्यतीत सुवर्णपदक मिळवलं. 200 मीटर फ्रीस्टाईलमध्ये तिला रौप्यपदक मिळाले.

हेही वाचा: विराटसह मुंबईतील खेळाडूंचे 'वर्क फ्राम होम'

दुबईत सराव

देशात सध्या कोरोना विषाणू महामारीमुळे जलतरण सुरु नाही. अशा परिस्थितीत संजनाने दुबईत पूर्णवेळ सराव केला. जलतरण प्रशिक्षक प्रदीप कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली संजनाने सराव करत कामगिरी उंचावली आहे. ती गोव्याची वयोगट पातळीवरील अव्वल जलतरणपटू आहे. तिने गोव्याचे राष्ट्रीय पातळीवरील वयोगट, तसेच शालेय जलतरण स्पर्धेत प्रतिनिधित्व केलंय. नववीत शिकणारी संजना गेल्या नऊ वर्षांपासुन जलतरण सराव करत आहे.

दिगंबर कामत यांच्याकडून कौतुक

संजनाच्या विक्रमी आंतरराष्ट्रीय कामगिरीचे गोवा विधानसभेतील विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी कौतुक केले आहे. ते गोवा जलतरण संघटनेचे अध्यक्षही आहेत. चार सुवर्ण व एक रौप्यपदक विजेत्या संजनाची कामगिरी भूषणावह असल्याचे कामत यांनी यांनी म्हटले.