T20 World Cup 2022 विजेता संघ होणार मालामाल; ICC कडून तब्बल 45 कोटींची बक्षिसे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ICC Announced Prize Money for T20 World Cup 2022

T20 World Cup 2022 विजेता संघ होणार मालामाल; ICC कडून तब्बल 45 कोटींची बक्षिसे

T20 World Cup 2022 Prize Money : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने आज (दि.30) ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपसाठीच्या बक्षीस रक्कमेची घोषणा केली. विजेत्या संघाला तब्बल 13 कोटी रूपयांच्यावर रक्कम मिळणार आहे. याबाबतची माहिती आयसीसीने आपल्या अधिकृत प्रसिद्धी पत्रकात दिली आहे. आयसीसी म्हणते, 'आयसीसी पुरूष टी 20 वर्ल्डकप 2022 चा विजेत्याची घोषणा 13 नोव्हेंबरला मेलबर्न येथे करणार आहे. या विजेत्या संघाला 1.6 मिलियन अमेरिकन डॉलर (जवळपास 13 कोटी रूपयांच्यावर) रक्कम बक्षीस म्हणून देण्यात येईल. याची निम्मी रक्कम ही उपविजेत्या संघाला देण्यात येईल.'

हेही वाचा: Sanath Jayasuriya : श्रीलंकेत या! जयसूर्याने भारतीयांना केली विनंती

जवळपास एक महिना आणि 16 संघांमध्ये रंगणाऱ्या या टी 20 स्पर्धेत जे संघ सेमी फायनलमध्ये पराभूत होणार आहेत. त्यांना प्रत्येकी 4 लाख अमेरिकी डॉलर (3 कोटी रूपयांच्या वर) मिळणार आहेत. आयसीसी यंदाच्या टी 20 स्पर्धेत बक्षिसांवर जवळपास 45 कोटी रूपयांच्यावर खर्च करणार आहे.

सुपर 12 फेरीत जे आठ संघ बाहेर पडणार आहेत. त्यांना प्रत्येकी 70 हजार अमेरिकी डॉलर (जवळपास 57 लाख रूपये) मिळणार आहेत. गेल्या टी 20 वर्ल्डकप प्रमाणेच याही वर्ल्डकपमध्ये सुपर 12 फेरीतील प्रत्येक विजय हा 40 हजार अमेरिकी डॉलर (जवळपास 32 लाख रूपये) किंमतीचा असणार आहे.

हेही वाचा: Umran Malik | मी असतो तर उमरान मलिकला घेतलं असतं : माजी निवडसमिती अध्यक्ष

आयसीसीने आपल्या अधिकृत प्रसिद्धीपत्रकात सांगितल्याप्रमाणे सुपर 12 मध्ये अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका या आठ संघाना थेट प्रवेश मिळाला आहे. याचबरोबर नामिबिया, श्रीलंका, नेदरलँड, युएई हे ग्रुप ए आणि वेस्ट इंडीज, स्कॉटलंड, आयर्लंड आणि झिम्बाब्वे हे ग्रुप बी मध्ये पात्रता फेरी खेळणार आहेत.