esakal | न्यूझीलंड- टीम इंडिया एकाच फ्लाईटमधून इंग्लंडला जाणार?

बोलून बातमी शोधा

IND vs NZ
न्यूझीलंड- टीम इंडिया एकाच फ्लाईटमधून इंग्लंडला जाणार?
sakal_logo
By
टीम ई सकाळ

इंडियन प्रीमियर लीगनंतर भारतीय संघाचे लक्ष्य इंग्लंडमध्ये पहिल्यांदाच होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) जिंकण्यावर असेल. 18 जून साउथहॅम्टनच्या मैदानात रंगणाऱ्या फायनलमध्ये न्यूझीलंड आणि भारत या दोन संघात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची लढत होणार आहे. सध्याच्या घडीला न्यूझीलंडचे 10 खेळाडू हे आयपीएलमध्ये खेळत आहेत. जगभरातील कोरोनाच्या परिस्थितीमुळे इंग्लंडला जाण्यापूर्वी न्यूझीलंडच्या खेळाडूंना मायदेशी परतणे शक्य नाही. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने आपल्या खेळाडूंना आयपीएलनंतरही भारतात राहण्यास सांगितले आहे. त्यामुळे न्यूझीलंडचे खेळाडू भारतीय संघासोबतच इंग्लंडला रवाना होतील, असा अंदाज बांधण्यात येत आहे.

हेही वाचा: IPL Record: 360 डिग्री एबी ठरला 'फास्टर फॉरेनर'

न्यूझीलंडमध्ये सध्याच्या घडीला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर क्वारंटाईनचे कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. केन विलियमसन, ट्रेंट बोल्ट, कायले जेमीसन आणि मिशेल सँटनर या प्रमुख खेळाडूंसह 10 खेळाडू सध्या आयपीएलमध्ये वेगवगळ्या संघाचा घटक आहेत. न्यूझीलंडचा संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपपूर्वी 2 जून पासून इंग्लंडमध्ये दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. यासाठी न्यूझीलंड संघाची घोषणाही करण्यात आलीये. या दोन कसोटी सामन्यानंतर भारताविरुद्ध होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी न्यूझीलंडचा 15 सदस्यांचा संघ निवडण्यात येणार आहे.

हेही वाचा: IPL 2021 : परदेशी खेळाडू आमची जबाबदारी; BCCI चे भावनिक पत्र

न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी हीथ मिल्स म्हणाले की, आयपीएल स्पर्धेनंतर खेळाडू मायदेशी परतणे शक्य नाही. इथे आल्यानंतर त्यांना दोन आठवडे क्वारंटाईन रहावे लागेल. आयपीएलमधील साखळी फेरीपर्यंत सर्व खेळाडू भारतातच राहणार आहेत. आयपीएल स्पर्धेतील बायोबबलमध्ये खेळाडू सुरक्षित असून तेथून खेळाडू इंग्लंड दौऱ्यावर कूच करतील, असे संकेत त्यांनी दिले.