IND vs AUS : 'आजचा दिवस...' लाजिरवाण्या पराभवानंतर कर्णधार रोहितचे मोठे वक्तव्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ind vs aus 2nd odi Captain rohit sharma big statement Australia thrash India by 10 wickets

IND vs AUS : 'आजचा दिवस...' लाजिरवाण्या पराभवानंतर कर्णधार रोहितचे मोठे वक्तव्य

IND vs AUS 2nd ODI Rohit Sharma : विशाखापट्टणम मधील स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव करून भारतीय संघ तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका जिंकेल अशी अपेक्षा होती, परंतु पाहुण्या संघाने तसे होऊ दिले नाही.

रविवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा एकतर्फी पराभव करत मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडवली. यानंतर आता मालिकेतील तिसरा सामना निर्णायक ठरला आहे. चेन्नईत होणाऱ्या तिसऱ्या सामन्यात जो संघ विजयी होईल तोच मालिका जिंकेल.

विशाखापट्टणम वनडेमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला कसलीच संधी दिली नाही. आधी घरच्या मैदानावर सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआऊट आणि नंतर 1 तास 66 चेंडूत सामना संपवला. एकदिवसीय क्रिकेटमधील चेंडूच्या बाबतीत भारताचा हा सर्वात मोठा पराभव आहे. विशाखापट्टणम एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने 234 चेंडूत आणि 10 गडी राखून भारताचा पराभव केला.

118 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ट्रॅव्हिस हेड आणि मिचेल मार्श या सलामीच्या जोडीने तुफानी खेळी केली. मार्शने 36 चेंडूत 66 धावा केल्या. या खेळीत मार्शने 6 चौकार आणि तब्बल 6 षटकार मारले. त्याचवेळी हेडने 30 चेंडूत 51 धावा ठोकल्या. हेडने आपल्या खेळीत 10 चौकार मारले.

भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा विशाखापट्टणम वनडेसाठी संघात परतला. पण, परतताना त्याला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. सामन्यानंतर रोहित शर्मा म्हणाला, “हा पराभव खरोखरच निराशाजनक आहे, यात शंका नाही. आम्ही आमच्या क्षमतेनुसार खेळलो नाही. परिस्थिती समजून आम्ही फलंदाजी केली नाही. खेळपट्टी आणि स्थिती समजली नाही. आम्हाला सुरुवातीपासूनच माहीत होते की 117 पुरेसे नाहीत. तसे विशाखापट्टणमच्या विकेटची किंमत 117 धावांवर नव्हती. फक्त आम्ही फलंदाजी खराब केली.

रोहित शर्मा पुढे बोलताना म्हणाला, आम्ही पहिल्याच षटकात शुभमन गिलची विकेट गमावली होती. यानंतर विराट कोहली आणि मी झटपट 30-35 धावा केल्या होत्या. पण नंतर मी आऊट झालो आणि आम्ही लागोपाठ दोन गडी गमावले. यामुळे आम्ही बॅकफूटवर आलो. अशा परिस्थितीतून परत येणे कठीण आहे. आजचा दिवस आमच्यासाठी नव्हता.