द्रविडनं खास मेसेज पाठवला अन् श्रेयस अय्यरनं इतिहास रचला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Indian team Head Coach Rahul Dravid and India's Shreyas Iyer
द्रविडनं खास मेसेज पाठवला अन् श्रेयस अय्यरनं इतिहास रचला

द्रविडनं खास मेसेज पाठवला अन् श्रेयस अय्यरनं इतिहास रचला

कानपूर कसोटीच्या (Kanpur Test) चौथ्या दिवशी भारतीय संघ अडचणीत सापडला होता. अवघ्या 51 धावांत टीम इंडियाचा अर्धा संघ तंबूत परतला. आघाडीचे फलंदाज स्वस्तात माघारी फिरल्यानंतर पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या श्रेयस अय्यरने खिंड लढवली. पहिल्या डावात शतकी खेळी करणाऱ्या श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) 65 धावांची खेळी करत संघाला मजबूत स्थितीत नेण्याचे काम केले.

अय्यरने दुसऱ्या डावात केलेल्या संयमी खेळीमागे राहुल द्रविडने मोठा वाटा उचलला. खुद्द अय्यरने डाव संपल्यानंतर यासंदर्भातील खुलासा केलाय. संघ अडचणीत असताना राहुल द्रविडने (Rahul Dravid) खास मेसेज पाठवला. त्याचे पालन केल्यानं संघाला अडचणीतून बाहेर काढणारी खेळी करणं शक्य झालं असे अय्यरने सांगितले.

तो म्हणाला की, रणजी सामन्यादरम्यान अशा परिस्थितीत फलंदाजी केली आहे. त्यामुळे एका सत्रात सर्वाधिक चेंडू खेळण्याचे मनात ठरवले होते. द्रविड सरांनीही हीच सूचना दिली होती. जेवढा वेळ मैदानात घालवता येईल तेवढा वेळ थांबून अधिकाधिक चेंडू खेळ, असा खास संदेश सरांनी दिला. त्याचे तंतोतंत पालन केले. 250 पेक्षा अधिक धावांची आघाडी मिळाल्याने आनंदी आहे, असेही तो यावेळी म्हणाला.

आपल्या खेळीपेक्षा टीम इंडियाचा विजय महत्त्वाचा असल्याचेही त्याने यावेळी बोलून दाखवले. सध्याच्या घडीला सर्व लक्ष्य हे टीम इंडियाच्या विजयावर आहे. आम्हाला अजून 9 विकेट घ्यायच्या आहेत तर न्यूझीलंडला 280 धावांची गरज आहे. भारतीय फिरकीपटूंच्या जोरावर अखेरच्या दिवशी टिम इंडिया विजयी होईल, असा विश्वासही त्याने व्यक्त केला. न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यातून कसोटी कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या श्रेयस अय्यरने पहिल्या डावात शतकी खेळी केली होती. त्यानंतर दुसऱ्या डावात त्याने अर्धशतकासह नवा इतिहास रचला. भारताकडून पदार्पणाच्या सामन्यात शतकी खेळीनंतर अर्धशतक झळकवणारा तो पहिला फलंदाजही ठरलाय.