IND vs PAK T20 : भारताचा विराट विजय; भारतीयांची दिवाळी गोड

IND vs PAK T20 Live
IND vs PAK T20 Liveesakal

India Vs Pakistan T20 World Cup 2022 : भारताने अखेर गेल्या वर्ल्डकपमधील दुबईतील पराभवाचे उट्टे मेलबर्नमध्ये लाखभर प्रेक्षकांच्या साक्षीने काढले. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 5 विकेट्स राखून पराभव करत वर्ल्डकपची दमदार सुरूवात केली. विराट कोहलीने 53 चेंडूत 83 धावा केल्या. त्याने हार्दिक पांड्याबरोबर पाचव्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचत गेलेला सामना खेचून आणला. भारताला शेवटच्या चेंडूवर विजयासाठी 1 धावेची गरज असताना अश्विनने चौकार मारत सामना संपवला.

144-5 : हार्दिक पांड्या झाला बाद 

भारताला शेवटच्या षटकात विजयासाठी 16 धावांची गरज असताना हार्दिक पांड्या पहिल्याच चेंडूवर झेलबाद झाला.

विराट कोहलीचे झुंजार अर्धशतक

भारत पाकिस्तानविरूद्ध अडचणीत असताना विराट कोहलीने झुंजार अर्धशतक ठोकत सामना जिवंत ठेवला. त्याने हार्दिक पांड्यासोबत पाचव्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचली.

हार्दिक पांड्याचा आक्रमक अवतार 

भारताच्या 31 धावात 4 विकेट पडल्यानंतर हार्दिक पांड्या आणि विराट कोहलीने डाव सावरण्यास सुरूवात केली. त्याने नवाझच्या एका षटकात तीन षटकार मारत धावगती वाढवण्यास सुरूवात केली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचली.

31-4 : अक्षर पटेल आला आणि गेला 

भारतीय संघाने सूर्यकुमार बाद झाल्यानंतर डावखुऱ्या अक्षर पटेलला शादाब खान विरूद्ध धावगती वाढवण्यासाठी बढती देऊन पाचव्या क्रमांकावर पाठवले. मात्र तो 2 धावा करून बाद झाला.

26-3 : सूर्या देखील परतला; भारत मोठ्या अडचणीत

रोहित - राहुल बाद झाल्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादवने पहिल्याच चेंडूवर चौकार मारत धडाकेबाज सुरूवात केली. मात्र 10 चेंडूत 15 धावा केल्यानंतर हारिस रौऊफच्या वेगाने त्याला चकवले.

10-2  : हारिस रौऊफने भारताच्या कर्णधाराची केली शिकार 

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौऊफने रोहित शर्माला 4 धावांवर बाद करत भारताला दुसरा धक्का दिला.

7-1 : भारताला पहिला धक्का; राहुल माघारी 

नसीम शाहने भारताचा सलामीवीर केएल राहुलला 4 धावावर बाद करत भारताला पहिला धक्का दिला.

भारतासमोर 160 धावांचे आव्हान 

151-8 : शेवटच्या षटकार भुवनेश्वरने विकेटचे खाते उघडले

भुवनेश्वर कुमारने शेवटच्या षटकात 8 चेंडूत 16 धावा करणाऱ्या शाहीन आफ्रिदीला बाद करत पाकिस्तानचा 8 वा फलंदाज माघारी धाडला.

120-7 : पाकिस्तानला आणखी एक धक्का, आसिफ अली आउट

अर्शदीप सिंगने आसिफ अलीला आउट करत पाकिस्तानला आणखी एक धक्का दिला आहे.

115-6 : हार्दिक पांड्याने पाकिस्तानला दिला सहावा धक्का

आता मोहम्मद नवाजही बाद झाला आहे. नवाजला हार्दिक पांड्याने बाद केले. नवाजने 9 धावा केल्या. पाकिस्तानची धावसंख्या सध्या सहा गड्यांच्या मोबदल्यात 115 धावा आहे.

98-5 : पाकिस्तानला पाचवा धक्का

पाकिस्तानला लागोपाठ दोन षटकांत तीन धक्के बसले आहेत. 14 व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर हार्दिक पांड्याने शादाब खानला सूर्यकुमार यादवकरवी झेलबाद केले. शादाबला सहा चेंडूंत पाच धावा करता आल्या. त्याचवेळी शेवटच्या चेंडूवर हार्दिकने हैदर अलीला सूर्यकुमार यादवकरवी झेलबाद केले. त्याला दोन धावा करता आल्या. 14 षटकांनंतर पाकिस्तानची धावसंख्या पाच गड्यांच्या मोबदल्यात 98 आहे. सध्या शान मसूद आणि मोहम्मद नवाज क्रीजवर आहेत.

 96-4  : हार्दिकने दिला चौथा धक्का 

हार्दिक पांड्याने देखील शादाब खानला 5 धावांवर बाद करत पाकिस्तानची अवस्था 4 बाद 96 अशी केली.

91-3 : अखेर मोहम्मद शमीनेच फोडली जोडी

फिरकीपटूंची धुलाई करत आपले अर्धशतक ठोकणाऱ्या इफ्तिकार अहमदला अखेर अनुभवी मोहम्मद शमीने घरचा रस्ता दाखवला. त्याने इफ्तिकारला 51 धावांवर पायचीत बाद केले.

इफ्तिकारचे आक्रमक अर्धशतक

बॉल टू रन खेळणाऱ्या इफ्तिकार अहमदने भारतीय फिरकीपटूंची धुलाई करत आपली धावगती वाढवली. त्याने अक्षर पटेलच्या एका षटकात तीन षटकार मारत आपले अर्धशतक 33 चेंडूत पूर्ण केले.

PAK 60/2 (10)  : शान मसूद - इफ्तिकार अहमदने डाव सावरला

अवघ्या 15 धावात पाकिस्तानने दोन्ही सलामीवीर गमावल्यानंतर शान मसूद आणि इफ्तिकार अहमदने पाकिस्तानचा डाव सावरण्यास सुरूवात केली. या दोघांनी 9 व्या षटकात पाकिस्तानचे अर्धशतक धावफलकावर लावले.

PAK 15/2 (4.1) : अर्शदीपचा धमाका, बाबर पाठोपाठ रिझवानलाही धाडले माघारी

अर्शदीप सिंगने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम पाठोपाठ आघाडीचा फलंदाज मोहम्मद रिझवानला देखील बाद करत दुसरी मोठी शिकार केली.

अर्शदीपची मोठी शिकार; बाबर पिहल्याच चेंडूवर माघारी 

भारताचा युवा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने सामन्याच्या दुसऱ्या आणि आपल्या पहिल्याच षटकाच्या पहिल्याच चेंडूवर बाबर आझमला शुन्यावर बाद केले.

IND vs PAK : पहा प्लेइंग-11

  • भारत : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग.

  • पाकिस्तान : बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), शान मसूद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हैदर अली, इफ्तिखार अहमद, आसिफ अली, नसीम शाह, हरिस रौफ, शाहीन शाह आफ्रिदी.

पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत रोहितने जिंकले नाणेफेक

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाच फलंदाज, दोन अष्टपैलू, तीन वेगवान गोलंदाज आणि एका फिरकीपटूसह मी या सामन्यात उतरल्याचे भारतीय कर्णधार रोहित शर्माने सांगितले. त्याचवेळी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम म्हणाला की, मी तीन वेगवान गोलंदाज, दोन फिरकी गोलंदाज आणि सहा फलंदाजांसह मैदानात उतरलो आहे.

IND vs PAK Melbourne Weather : मेलबर्न मध्ये सूर्यप्रकाश

स्टार स्पोर्ट्सवर नुकतेच एक सुखद दृश्य पाहायला मिळाले. मेलबर्न क्रिकेट मैदानावर आता आकाश पूर्णपणे निरभ्र आहे. मेलबर्नच्या आकाशात सूर्य दिसायला लागला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यादरम्यान पावसाची शक्यता नाही. सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरू होईल.

मेलबर्नचे पिच कोणाला देणार साथ? 

ऑस्ट्रेलियात होत असलेल्या टी 20 वर्ल्डकप 2022 मधील सर्वात हाय व्होल्टेज सामना, भारत आणि पाकिस्तान सामना अवघ्या काही तासात सुरू होईल.  MCG चा पिच रिपोर्ट एका क्लिक वर सविस्तर बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा

IND vs PAK T20 Live: मेलबर्नमध्ये काळे ढग; जाणून घ्या हवामान रिपोर्ट

मेलबर्नमध्ये ढगाळ आहे, परंतु अद्याप पाऊस सुरू झालेला नाही. स्थानिक वेळेनुसार 8 ते 9 वाजेदरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे. प्रेक्षक मैदानावर यायला लागले आहेत.

IND vs PAK Melbourne Weather :  मेलबर्नमध्ये हवामान कसे असेल

मेलबर्नमध्ये शनिवारी रात्री ढगाळ वातावरण होते, पण पाऊस पडला नाही. रविवारीही आकाशात ढग असतात. अजून पाऊस झालेला नाही. ही दोन्ही देशांसाठी आनंदाची बाब आहे. सामन्यादरम्यान पावसाची शक्यता..... सविस्तर बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा

India vs Pakistan Live Cricket Score T20 World Cup : शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 5 विकेट्स राखून पराभव करत वर्ल्डकपची दमदार सुरूवात केली. विराट कोहलीने 53 चेंडूत 83 धावा केल्या.

पाकिस्तानच्या 160 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरूवात खराब झाली. भारताचे दोन्ही सलामीवीर प्रत्येकी 4 धावा करून माघारी परतले. नसीम शाहने केएल राहुलची तर हारिस रौऊफने कर्णधार रोहित शर्माची शिकार केली.

रोहित - राहुल बाद झाल्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादवने पहिल्याच चेंडूवर चौकार मारत धडाकेबाज सुरूवात केली. मात्र 10 चेंडूत 15 धावा केल्यानंतर हारिस रौऊफच्या वेगाने त्याला चकवले. भारतीय संघाने सूर्यकुमार बाद झाल्यानंतर डावखुऱ्या अक्षर पटेलला शादाब खान, नवाझविरूद्ध धावगती वाढवण्यासाठी बढती देऊन पाचव्या क्रमांकावर पाठवले. मात्र तो 2 धावा करून बाद झाला.

भारताच्या 31 धावात 4 विकेट पडल्यानंतर हार्दिक पांड्या आणि विराट कोहलीने डाव सावरण्यास सुरूवात केली. त्याने नवाझच्या एका षटकात तीन षटकार मारत धावगती वाढवण्यास सुरूवात केली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचली.

या दोघांनी सामना 30 चेंडूत 60 धावा असा आणला. मात्र फिरकीपटूंविरूद्ध आक्रमक फलंदाजी करणाऱ्या हार्दिक आणि विराट कोहलीची पाकिस्तानचे वेगवान गोलंदाज गोलंदाजी करण्यासाठी येताच धावगती मंदावली.

मात्र विराट कोहलीने स्लॉग ओव्हरमध्ये आपला गिअर बदलला. त्याने फटकेबाजी सुरू करत 19 वे षटक टाकणाऱ्या हारिस रौऊफला सलग दोन षटकार मारत सामना 6 चेंडूत 16 धावा असा आणला. मात्र हार्दिक पांड्या पहिल्याच चेंडूवर झेलबाद झाला. तो 36 चेंडूत 40 धावा करून माघारी परतला. त्यानंतर कार्तिकने 1 तर विराटने 2 धावा करून सामना 3 चेंडूत 13 धावा असा आणला.

मात्र नवाझने नो बॉल टाकत भारताला विजयाची संधी निर्माण करून दिली. विराटने नो बॉलवर षटकार मारत सामना 3 ला 6 धावा असा आणला. पुढचा चेंडू नवाझने वाईड टाकला त्यामुळे सामना 3 चेंडूत 5 धावा असा होता. नवाझने विराटला बोल्ड केले मात्र नो बॉल असल्याने सामना 2 चेंडूत 2 धावा असा आणला. स्ट्राईकवर असलेल्या दिनेश कार्तिक स्टम्पिंग आऊट झाला. भारताला आता 1 चेंडू आणि 2 धावांची गरज होती. नवाजने वाईड टाकत सामना भारताच्या खिशात टाकला. विजयासाठी 1 धावेची गरज असताना अश्विनने चौकार मारत विजय साकारला.

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करत पाकिस्तानला 159 धावात रोखले. भारताकडून अर्शदीप सिंग आणि हार्दिक पांड्याने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमारने प्रत्येकी 1 विकेट घेत या दोघांना चांगली साथ दिली. पाकिस्तानकडून शान मसूद (52) आणि इफ्तिकार अहमदने (51) अर्धशतकी खेळी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com