IND vs AUS Final : टॉप ऑर्डर ढेपाळली, गोलंदाजीही फेल... सलग 10 सामने जिंकणाऱ्या भारताने 'या' कारणामुळे गमावली फायनल

IND vs AUS Final
IND vs AUS Final esakal

Reasons Behind India Lost In World Cup 2023 Finals : भारतात झालेल्या वनडे वर्ल्डकप 2023 मध्ये यजमान संघ भारताने संपूर्ण स्पर्धेत दादागिरी केली. सलग 10 सामने जिंकत वर्ल्डकप आपलाच आहे असं ठासून सांगितलं. भारताची टॉप ऑर्डर, गोलंदाजी, फिल्डिंग सगळंच नजर लागण्या इतकं सुंदर झालं होतं.

मात्र भारताची ही दादागिरी ऑस्ट्रेलियाने फायनलमध्ये मोडून काढली. गेल्या 10 सामन्यात ज्या विभागातील कामगिरीवर भारत वर्ल्डकपवर दावेदारी ठोकत होता. त्याच विभागात कांगारूंनी भारताला मात दिली. भारताचं फायनलमध्ये असं काय बिनसलं की त्यांना मायदेशातही वर्ल्डकप जिंकता आला नाही.

IND vs AUS Final
Ind vs Aus Final : ऑस्ट्रेलियाचा 'सिक्सर'! मोदी स्टेडियमवर भारताचे स्वप्न भंगले... वर्ल्ड कप फायनलमध्ये पराभव

पहिल्या 10 षटकातच कांगारूंची पकड

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामन्यात दोन्ही संघांसाठी पहिली 10 षटके फार महत्वाची होती. आज भारताने पहिल्या 10 षटकात 8 च्या सरासरीने 80 धावा केल्या. ही चांगली सुरूवात होती. मात्र त्या जोडीला भारताने दोन विकेट्स देखील गमावल्या होत्या. शुभमन गिल 4 धावांवर तर रोहित शर्मा 47 धावांवर बाद झाला. भारताचा आक्रमक फलंदाज रोहित बाद झाल्यानंतर भारताच्या धावगतीला मोठा ब्रेक लागला. पुढची 20 षटके हा ब्रेक तसाच राहिला.

कांगारूंची फिल्डिंग अन् फिल्ड प्लेसमेंट म्हणजे जखमेवर मीठ

ऑस्ट्रेलियाने आजच्या सामन्यात दमदार गोलंदाजी केलीच याचबरोबर त्यांनी फिल्डिंग देखील दमदार केली. त्यांनी भारताच्या सिंगल्स रोखल्या होत्याच मात्र त्यांनी चौकार देखील रोखल्याने भारताचा स्कोअर बोर्ड मंद झाला. 11 ते 30 षटकात भारताला फक्त दोनच चौकार मारता आले.

पॅट कमिन्ससह कांगारूंच्या फिरकीपटूंनी देखील टिच्चून मारा केला. त्याला त्यांच्या क्षेत्ररक्षकांनी उत्तम साथ दिली. नरेंद्र मोदी स्टेडियम हे मोठं ग्राऊंड आहे. त्यात स्लो विकेटवर धावा करणं अवघड होतं अशात कांगारूंनी जीव तोडून फिल्डिंग करत जवळपास 20 ते 30 धावा वाचवल्या. कमिन्सने देखील फिल्ड प्लेसमेंट उत्तम लावली होती.

ज्यावेळी तो विराट अन् केएलला शॉर्टऑफ गुडलेंथवर कटर्सचा मारा करत होतो. त्यावेळी त्याने लेग साईड पॅक करून ठेवली होती. त्यामुळे विराटला पूल शॉट्स मारण्यावर बंधन आलं. त्यात सीमारेषा लांब असल्याने अजूनच अडचण झाली.

भारताचा एकही फलंदाज शेवटपर्यंत खेळला नाही

भारताने नाणेफेक जिंकल्यानंतर आपल्याला स्लो खेळपट्टीवर फलंदाजी करावी लागली. त्यामुळे भारताचा एक फलंदाज तरी शेवटपर्यंत टिकून अँकर इनिंग खेळण्याची गरज होती. मात्र रोहित शर्मा 47 धावा करून बाद झाला. विराट कोहली अन् केएल सेट होत आहेत असे वाटत असतानाच कोहली 54 धावा करून बाद झाला.

त्यानंतर केएल राहुलबाबत देखील तसंच झालं. तो 66 धावा करून सेट झाला. मात्र ज्यावेळी धावगती वाढवायची त्यावेळी तो बाद झाला अन् भारताच्या 30 ते 40 धावा कमी झाल्या.

IND vs AUS Final
IND vs AUS WC Final 2023 : कमिन्सनं खरोखरचं प्रेक्षकांना शांतच केलं, दिला मोठा धक्का!

बॉलिंग चेंजेस

पॅट कमिन्सने आजच्या सामन्यात खुबीने बॉलिंग चेंजेस केले. त्याने पहिल्या 10 षटकातच चार गोलंदाजांचा वापर केला. त्यानंतर त्याने 21 ते 30 मध्ये सात गोलंदाजांना वापरत त्यांना छोटे छोटे स्पेल दिले. यामुळे भारतीय फलंदाजाला एका गोलंदाजाविरूद्ध सेट होता आले नाही. याचा परिणाम धावगतीवर झाला.

कोणत्या जोडीला मोठी भागीदारी रचता आली नाही. पहिल्या 10 षटकांचा खेळ सोडला तर इतर चार 10 षटकांच्या सत्रात भारताला 35 ते 40 धावांच्या वर धावा करता आल्या नाहीत.

भारताची गचाळ फिल्डिंग

ऑस्ट्रेलियाने भारताला 240 धावात रोखले असले तरी त्यांच्या दृष्टीने देखील पहिली 10 षटके खूप महत्वाची होती. त्यामध्ये भारतीय गोलंदाजांनी चांगला मारा केला मात्र त्याला फिल्डर्सची साथ लाभली नाही. पहिल्याच षटकता स्लीपमधून झेल गेला. संपूर्ण स्पर्धेत चांगली किपिंग करणाऱ्या केएल राहुलने या सामन्यात मात्र ढेंगेतून चौकार दिले.

एकीकडे भारतीय फलंदाज चौकारांसाठी झगडत होते तर दुसरीकडे भारतीय क्षेत्ररक्षक कांगारूंना मिस फिल्ड करून चौकार देत होते. लो स्कोरिंग सामन्यात फिल्डिंगवर तुम्ही 20 ते 30 धावा अधिकच्या अडवणे अपेक्षित असते. मात्र ते झालं नाही अन् पहिल्या सत्रात चांगली गोलंदाजी करूनही भारताला सामन्यावर पकड निर्माण करता आली नाही.

शेवटी ऑस्ट्रेलियन मानसिकता

ऑस्ट्रेलिया हा या पृथ्वीतलावरील असा संघ आहे जो साखळी फेरीत कसाही खेळू दे बाद फेरीत आला ती त्यांच्या अंगात संचारतं. पॅट कमिन्स वरवर शांत दिसत असला तरी त्याच्यात ऑस्ट्रेलियाची मानसिकता ठासून भरली आहे. त्याने सामन्यापूर्वीच 1.30 लाख लोकांना अंगावर घेतलं. त्यांना शांत करण्याची आमची रणनिती असेल असं त्यानं सांगितलं होतं.

सामन्यात देखील पहिल्या चेंडूपासूनच ऑस्ट्रेलिया वर्चस्व मिळवण्याच्या वृत्तीने खेळली. त्यांनी भारत पहिल्या 10 षटकात चोपत असला तरी विकेट्स घेण्याचा सपाटा सोडला नाही. ते रोहित - विराटच्या हाणामारीने दबावात आले नाहीत तर त्यांनाच बाद करत त्यांनी भारताला दबावात आणलं. कांगारूच्या 6 वर्ल्डकप जिंकण्याचं गमक देखील याच ऑस्ट्रेलियन वर्चस्ववादी मानसिकतेत आहे.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com