
Mohammad Siraj’s Stunning Performance Praised: भारताने इंग्लड विरुद्धच्या अटीतटीच्या ठरलेल्या पाचव्या कसोटीत विजय मिळवला आहे. भारताच्या या विजयामुळे ही कसोटी मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली आहे. भारताने आजचा विजय एकप्रकारे इंग्लडच्या हातून काढूनच घेतला आहे. तर या विजयात भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याचा सिंहाचा वाटा दिसला. त्यामुळे भारताच्या या विजयाच्याबरोबरीनेच सिराजचंही संपूर्ण देशभरातून कौतुक होत आहे. आपल्या भेदक गोलंदाजीच्या बळावर सिराजने इंग्लडच्या फलंदाजांना विकेट देण्यासं हतबल केल्याचं दिसून आलं.
सिराजच्या या कामगिरीनंतर त्याच्यावर सर्वांकडून कौतुकाचा वर्षाव सुरू असताना, एमआयएमचे प्रमुख आणि खासदार ओवैसी यांनीही खास हैदराबादी स्टाइलने आपल्या या हैदराबादी खेळाडूंचं कौतुक केलं आहे. ओवैसींनी सिराजचं केलेलं कौतुक सोशल मीडिया आणि मीडियावरही व्हायरल होत आहे.
ओवैसींनी एक्सवर एक पोस्ट केली आहे, ज्यामध्ये सिराज विकेट घेतल्यानंतर त्याच्या हटके स्टाइलने सेलिब्रिशन करतानाचा व्हिडिओ आहे. शिवाय, या व्हिडिओसोबत ओवैसींनी सिराजचं कौतुक करत म्हटलंय की, ‘’सदैव विनर, जसं की आम्ही हैदराबादीत नेहमी म्हणत असतो, पूरा खोल दिया पाशा...’’
पाचव्या कसोटीत सिराजने भेदक गोलंदाजी करत १०४ रन देत, पाच विकेट मिळवल्या आणि भारताच्या विजयात मोठा वाटा उचलला. सिराजने संपूर्ण मालिकेत एकूण २३ विकेट मिळवल्या आणि दोन्ही संघामधून सर्वात उत्कृष्ट गोलंदाज ठरला.
पाचव्या कसोटी विजयानंतर मोहम्मद सिराज म्हणाला, खरं सांगायचं, तर मला खूप आनंद झालाय.. पहिल्या दिवसापासून आम्हाला कडवी टक्कर द्यायची होती आणि हा निकाल पाहून खूप अभिमान वाटतोय. रणनिती सोपी होती की टप्प्यावर मारा करा. मी आज सकाळी उठलो तेव्हा, मी हे करू शकतो, असा मी स्वतःला विश्वास दिला. मी गुगलवर गेलो अन् Self Believe चा फोटो डाऊनलोड केला. तो फोटो मी मोबाईलच्या वॉलपेपरवर ठेवला.
तसेच, काल मी हॅरी ब्रूकची कॅच घेतली असती, तर आजचा दिवस आम्हाला सामना खेळावाच लागला नसता. पण, ब्रुकने खूप चांगली खेळी केली. लॉर्ड्समधील पराभव माझ्यासाठी हार्ट ब्रेकिंग क्षण होता. तेव्हा जड्डू भाईने मला सांगितेल, की तुला इथपर्यंत पोहोचवण्यासाठी वडिलांनी केलेले कष्ट आठव आणि त्यांच्यासाठी खेळ, असेही सिराजने सांगितले.