IND vs ENG : भारत बाद फेरीचा अडथळा ओलांडणार? उपांत्य फेरीत इंग्लंडशी लढत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

India vs England

IND vs ENG : भारत बाद फेरीचा अडथळा ओलांडणार? उपांत्य फेरीत इंग्लंडशी लढत

IND vs ENG T20 WC 2022 Semifinal : भारतीय क्रिकेट संघासमोर आज अॅडलेड येथे होणाऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत इंग्लंडचे आव्हान असणार आहे. भारताने २०१३ मध्ये आयसीसी चॅम्पियन्स करंडकाचे जेतेपद पटकावल्यानंतर संघाला आयसीसी अंतर्गत स्पर्धा जिंकता आलेल्या नाहीत. गेल्या नऊ वर्षांमध्ये चॅम्पियन्स करंडक, टी-२० विश्वकरंडक, एकदिवसीय विश्वकरंडक या प्रतिष्ठेच्या स्पर्धांच्या बाद फेरीचा अडथळा टीम इंडियाला ओलांडता आलेला नाही. रोहित शर्माच्या नेतृत्वात मैदानात उतरणारा भारतीय संघ आज जॉस बटलरच्या इंग्लंडवर विजय मिळवतो का, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

हेही वाचा: IND vs ENG: सेमीफायनल सामन्याआधी आली वाईट बातमी! 'हा' गोलंदाज दुखापतीमुळे बाहेर

भारत व इंग्लंड या दोन्ही संघांची टी-२० विश्वकरंडकातील आतापर्यंतची कामगिरी समसमानच ठरली आहे. दोन्ही संघांना फक्त एकाच लढतीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. इंग्लंडच्या संघाने गट एकमधून ३ विजय व ७ गुणांसह दुसरे स्थान पटकावले आणि आगेकूच केली. भारतीय संघाने चार विजय व आठ गुणांसह पहिले स्थान पटकावले आणि अंतिम चारमध्ये प्रवेश केला.

पंत की कार्तिक, अक्षर की चहल?

भारतीय संघाने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली असली, तरी हा संघ अजून स्थिर वाटत नाही. दिनेश कार्तिकला फिनिशर म्हणून संघात खेळवण्यात येत आहे, पण त्याला ठसा उमटवता आलेला नाही. अॅडलेडचे मैदान ऑस्ट्रेलियातील इतर स्टेडियमच्या तुलनेने आकाराने लहान आहे. तसेच येथील खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांना पोषक असे वातावरण असेल. हेच डोळ्यांसमोर ठेवून डावखुरा फलंदाज संघात असायला हवा असे ठरवल्यास रिषभ पंतला भारतीय संघात संधी मिळू शकते, पण प्रशिक्षक राहुल द्रविड कार्तिकला वगळून पंतला खेळवण्याचा निर्णय घेतील का, हाही प्रश्न या वेळी निर्माण होत आहे. तसेच अक्षर पटेल यानेही अद्याप शानदार कामगिरी केलेली नाही. त्यामुळे फिरकी गोलंदाजांना पूरक असलेल्या खेळपट्टीवर युझवेंद्र चहलला संधी द्यायला हरकत नाही, पण येथेही संघ व्यवस्थापन कोणता निर्णय घेतो हे पाहायला नक्कीच आवडेल.

हेही वाचा: Shoaib Malik VIDEO : आधी सडकून टीका आता फायनलला गेल्यानंतर शोएबचा नाचून दंगा!

एखाद्या लढतीवरून निकष नको : रोहित

भारतीय संघाला २०१३ नंतर महत्त्वाच्या स्पर्धांमधील बाद फेरीचा अडथळा ओलांडता आलेला नाही. रोहित शर्मालाही बाद फेरीच्या लढतींमध्ये धावांचा पाऊस पाडता आलेला नाही. यावर रोहित शर्माला विचारले असता तो म्हणाला, मीच नव्हे तर कोणताही खेळाडू वर्षभर मेहनत करीत असतो. भारताच्या विजयासाठीच तो प्रयत्न करीत असतो. त्यामुळे एखाद्या लढतीतील कामगिरीवरून निकष लावू नये, असे तो स्पष्टपणे म्हणाला. ऑस्ट्रेलियातील मैदानाच्या आकारांवरून रोहितने या वेळी मत व्यक्त केले. तो म्हणाला, ऑस्ट्रेलियातील प्रत्येक स्टेडियमचा आकार भिन्न आहे. त्यामुळे प्रत्येक सामन्यासाठी त्या मैदानातील आकाराशी जुळवून घ्यावे लागते.

हेही वाचा: Shaheen Afridi : सेलीब्रेशन करताना आफ्रिदीने घेतली मोठी रिस्क; फायनलला मुकणार...

इंग्लंडमध्ये मालिका जिंकल्याचा फायदा

'इंग्लंडचा ट्वेंटी-२० संघ अतिशय बलाढ्य असला, तरी आम्ही त्यांना या वर्षी जुलै महिन्यात झालेल्या २० षटकांच्या सामन्यांच्या मालिकेत हरवले होते आणि याचाच फायदा आम्हाला उद्या (ता. १०) होणाऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात होणार आहे,' असे मत भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने व्यक्त केले आहे. जुलै महिन्यात झालेल्या तीन ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेत भारताने इंग्लंडला त्यांच्याच देशात २-१ असे नमवले होते आणि याच मालिका विजयामुळे आम्हाला बलाढ्य इंग्लंडविरुद्ध खेळण्याचा आत्मविश्वास निर्माण झल्याचेही रोहित म्हणाला. "इंग्लंडला त्यांच्याच देशात ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेत पराभूत करणे हे नक्कीच अवघड असते आणि हा करिष्मा आम्ही केल्याने आमचा आत्मविश्वास वाढला आहे. या स्पर्धेत आमचा फक्त दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात पराभव झाला होता. बाकी सगळे अगदी मनासारखे आणि आखलेल्या योजनेसारखे घडत आहे. आयसीसीच्या कोणत्याही स्पर्धेतील बाद फेरी नेहमीच आव्हानात्मक असते आणि आम्ही त्यासाठी सज्ज आहोत. सांघिक खेळ केला, तर विजय आमच्यापासून दूर नसेल" असे मत रोहित शर्मानि उपांत्य फेरीच्या सामन्याअगोदर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.