यंग-लॅथम जोडी जमली; दबावात टीम इंडियाने गमावला रिव्ह्यू! | India vs New Zealand 1st Test Day 2 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

India vs New Zealand
यंग-लॅथम जोडी जमली; दबावात टीम इंडियाने गमावला रिव्ह्यू!

यंग-लॅथम जोडी जमली; दबावात टीम इंडियाने गमावला रिव्ह्यू!

India vs New Zealand 1st Test Day 2 कानपूरच्या मैदानात रंगलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने टीम इंडियाचा पहिला डाव 345 धावांत आटोपला. न्यूझीलंडने पहिल्या डावाला दमदार सुरुवात करुन भारतीय गोलंदाजांचे खांदे पाडले आहेत. विल यंग आणि टॉम लॅथम जोडीनं संघाला उत्तम सुरुवात करुन दिलीये. पाचवा कसोटी सामना खेळणाऱ्या विल यंगने आपल्या कसोटी कारकिर्दीतील दुसरे अर्धशतक पूर्ण केले आहे. दुसऱ्या बाजूला अनुभवी टॉम लॅथम संयमी खेळीसह त्याला सुरेख साथ देत आहे. दोघांनी शतकी भागीदारी पूर्ण केली आहे.

हेही वाचा: VIDEO : बोल्ड झाल्यावर जाडेजा स्वत:वरच चिडला!

न्यूझीलंडची ही जोडी जमल्यामुळे टीम इंडिया बॅकफूटवर आली असून संघ पहिल्या विकेटच्या शोधात आहे. रविंद्र जाडेजाच्या षटकात भारतीय संघाने विल यंगच्या विकेटसाठी एक रिव्ह्यूही गमावल्याचे पाहायला मिळाले. जाडेजाचा चेंडूवर स्विप करण्याचा यंगचा प्रयत्न फसला. भारतीय संघाने केलेली जोरदार अपिल मैदानातील पंचांनी फेटाळून लावली. यावेळी भारतीय संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणेनं रिव्ह्यू घेतला. रिव्ह्यू घेण्याचा हा निर्णय टीम इंडिया दबावात असल्याचे संकेतच होते. चेंडू लेग स्टम्पच्या बाहेर जात असल्याचे रिप्लायमध्ये दिसून आले.

हेही वाचा: "श्रेयस, तू ३०० रन्स केल्यास तरी तुला संघातून बाहेरच काढणार"

न्यूझीलंडच्या डावातील तिसऱ्या षटकात न्यूझीलंडने यशस्वी रिव्ह्यू घेतल्याचे पाहायला मिळाले. इशांत शर्माच्या गोलंदाजीवर टॉम लॅथमला मैदानातील पंचांनी बाद दिले होते. यावेळी लॅथमने यशस्वी रिव्ह्यू घेतला. मैदानातील पंच नितीन मेनन यांनी त्याला पायचित दिले. पण चेंडूने आधी बॅटची कड घेतली होती. ही गोष्ट लॅथमला माहिती होती. त्यामुळेच क्षणाचाही विलंब न करता लॅथमने रिव्ह्यू घेतला आणि त्याने स्वत:ची विकेट वाचवली. पंचांना आपला निर्णय बदलावा लागला. न्यूझीलंडच्या यशस्वी रिव्ह्यूमुळे इशांतच्या विकेटचा शोध कायम राहिला.

loading image
go to top