

Asian Games 2026
esakal
नागोया : भारतीय नेमबाजांची आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदकांची लयलूट सोमवारीही कायम राहिली. महिलांच्या १० मीटर एअर रायफलमध्ये रविवारी सांघिक व वैयक्तिक अशा दोन प्रकारांमध्ये पदके पटकावल्यानंतर भारतीय नेमबाजांनी सोमवारी पुरुषांच्या एअर रायफल सांघिक व वैयक्तिक अशा दोन प्रकारांमध्ये पदकांवर मोहर उमटवली.
महाराष्ट्राच्या नेमबाजांनी भारताच्या घवघवीत यशामध्ये मोलाचा वाटा उचलला. भारतीय नेमबाजांनी पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात रौप्य आणि वैयक्तिक प्रकारात रौप्य व ब्राँझ पदकांची कमाई केली. रौप्यपदक पटकावलेल्या भारताच्या सांघिक संघामध्ये रुद्रांक्ष पाटील, पार्थ माने या महाराष्ट्राच्या खेळाडूंसह हिमांशू धिल्लोन या खेळाडूचा समावेश होता. हिमांशूने वैयक्तिक प्रकारात रौप्य आणि रुद्रांक्षने ब्राँझपदकावर हक्क सांगितला. रुद्रांक्ष व हिमांशू यांनी एकाच दिवशी दोन पदके पटकावली. भारतीय नेमबाजांनी दोन दिवसांत एकूण पाच पदकांची माळ गळ्यात घातली, हे विशेष.
पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल वैयक्तिक प्रकारात पॅरिस ऑलिंपिकमध्ये दोन सुवर्णपदक पटकावलेल्या चीनच्या शेंग लिहाओ याने वर्चस्व कायम राखले. त्याने २५४.२ गुणांची कमाई करीत आशियाई विक्रम नोंदवला आणि सुवर्णपदक जिंकले. भारताच्या हिमांशू याने २५२.४ गुणांची कमाई करीत रौप्यपदक पटकावले. रुद्रांक्ष याने २३०.९ गुणांची कमाई करीत ब्राँझपदकावर नाव कोरले.
पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात चीनचे वर्चस्व कायम राहिले. शेंग, चँगहाँग झँग व सिहान मा या चीनच्या नेमबाजांनी १८९९.०० गुणांची कमाई करीत सुवर्णपदक पटकावले. कैरो येथे मागील वर्षी झालेल्या स्पर्धेमध्ये चीनच्या नेमबाजांनी १८९८.४ गुणांची कमाई करीत विक्रम प्रस्थापित केला होता. आज तो विक्रम अबाधित राखत गुणांची संख्या वाढवली.
भारताच्या रुद्रांक्ष पाटील, पार्थ माने, हिमांशू धिल्लोन या नेमबाजांनी १८९०.१ गुणांची कमाई करीत रौप्यपदक पटकावले. दक्षिण कोरियाच्या नेमबाजांनी १८८४.२ गुणांची कमाई करीत ब्राँझपदक आपल्या नावे केले.
सोलापूरमध्ये जन्मलेल्या पार्थ माने याने पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले. तो पहिल्यांदाच आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी झाला होता. पदक जिंकल्यानंतर त्याने प्रतिक्रिया देताना म्हटले की, आशियाई क्रीडा स्पर्धेतील अनुभव माझ्यासाठी मोलाचा आहे. या स्पर्धेमधून मला शिकायला मिळत आहे. दबावाखाली कशा प्रकारे खेळायला हवे, याचा अभ्यास करायला मिळत आहे. आता मिश्र दुहेरीमध्ये मला सहभागी व्हायचे आहे. त्यामुळे सध्या सेलिब्रेशनपासून दूरच आहे. दरम्यान, पार्थ माने हा सुमा शिरुर यांच्या मार्गदर्शनात नेमबाजीचे धडे आत्मसात करीत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.