नवी दिल्ली : भारतीय पुरुष हॉकी संघाचा अनुभवी स्ट्रायकर एस. व्ही. सुनीलने शुक्रवारी आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्तीची घोषणा केली. या घोषणेनंतर १४ वर्षांच्या त्याचा बहारदार कारकीर्दीचा शेवट झाला आहे. ३२ वर्षीय सुनील २०१४ मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा महत्त्वपूर्ण भाग होता.
भारतीय हॉकीपटूंमध्ये जणू निवृत्तीसाठीची स्पर्धाच लागली आहे. कालच टोकियो ऑलिंपिक स्पर्धेतील भारतीय संघाच्या ऐतिहासिक ब्राँझपदक जिंकण्याच्या मोहिमेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या ड्रॅग-फ्लिकर रुपिंदर पाल सिंग आणि बचावपटू बीरेंद्र लाक्रा यांनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर आता सुनीलनेही निवृत्तीची घोषणा करत भारतीय हॉकी विश्वाला धक्का दिला आहे. भारतासाठी खेळताना २६४ सामन्यांमध्ये ७२ गोलची नोंद करणारा सुनील मूळचा कर्नाटकचा आहे. तसेच त्याला प्रतिष्ठित अर्जुन पुरस्कारानेही गौरविण्यात आलेले आहे. दरम्यान, टोकियो ऑलिंपिकमध्ये ब्राँझ जिंकणाऱ्या संघाचा सुनील भाग नव्हता. ‘आगामी पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेत तरुण व प्रतिभावान खेळाडूंसाठी मार्ग मोकळा करून भारतासाठी विजयी संघ तयार करण्याची आता वेळ आली आहे,’ असे सुनीलने निवृत्तीनंतर म्हटले आहे.
२००७ मधील आशियाई स्पर्धेच्या अंतिम फेरीत पाकिस्तानला हरवून करंडक जिंकणाऱ्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केल्यानंतर सुनीलने मागे वळून पाहिलेच नाही. त्यानंतर जागतिक हॉकीमध्ये भारताच्या अविश्वसनीय भरभराटीचा तो एक प्रमुख भाग राहिला. दोन वेळा भारताच्या ऑलिंपिक संघाचा (२०१२ आणि २०१६) असणारा सुनील त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे एक दशकाहून अधिक काळ भारतीय फॉरवर्ड-लाइनचा प्रमुख खेळाडू राहिला.
बांबूची काठी हातात घेऊन हॉकी खेळण्यापासून ते भारतीय संघाची निळ्या रंगाची जर्सी परिधान करण्यापर्यंतचा हा प्रवास अविस्मरणीय होता. या १४ वर्षांच्या कालावधीत अनेक ऐतिहासिक मोहिमांमध्ये भारतीय संघाचा भाग असल्याचा मला अभिमान आहे; परंतु आता थांबण्याचा निर्णय मी घेतला आहे. शुभेच्छांसाठी सर्वांचे आभार!
- एस. व्ही. सुनील, भारताचा हॉकीपटू.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.