INDvBAN : बांगलादेशची दीडशतकी मजल; भारतीय गोलंदाजांची निष्प्रभता

वृत्तसंस्था
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

दुष्काळात तेरावा महिना म्हणजे दासने उंच मारलेला फटका झेलण्यासाठी तिघे खेळाडू धावले अखेर रोहितच्या हातून झेल सुटला.

राजकोट : सोप्या चुका आणि गोलंदाजीतील निष्प्रभता यामुळे सुरुवातीला मुक्त हस्ते धावा देणाऱ्या भारताने दुसऱ्या ट्‌वेन्टी-20 सामन्यात बांगलादेशला 20 षटकांत 6 बाद 153 धावांत रोखले. रिषभ पंतची यष्टीरक्षणातील चूक आणि खलिल अहमदची महागडी गोलंदाजी भारताला डोईजड ठरली. 

नवी दिल्लीतील सामन्यात भारतासाठी महागडा ठरलेला खलिल अहमद आजही बांगलादेशसाठी गिऱ्हाईक ठरला. त्याच्यावर सलामीवीर नईमने हल्ला करत सलग तीन चौकार मारले डावातले हे दुसरेच षटक होते त्याअगोदर पहिल्या षटकातील अखेरच्या चेंडूवर लिटॉन दासने चौकार मारला होता. त्यामुळे दुसऱ्याच षटकात बांगलादेशच्या धावफलकावर 20 धावा झळकल्या होत्या. 

पाचव्या षटकांत खलिल पुन्हा गोलंदाजी देण्यात आली आणि त्याच्या पहिलाच चेंडू सीमापार धाडण्यात आल्यावर भारतासमोर अडचणी वाढल्या होत्या. 

पंतची अनाकलनीय चूक 

बांगलादेशची सलामीची जोडी फोडण्याची मिळालेली संधी रिषभ पंतने अनपेक्षित चुकीने वाया घालवली. युझवेंद्र चहलच्या चेंडूवर दास चकला पंतने त्याला यष्टीचीतही केले, पण त्याने चेंडू यष्टींच्या पुढे पकडल्यामुळे तो नाबाद तर ठरलाच परंतु तो नोबॉल ठरवण्यात आला. या संधीचा फायदा घेत त्याने चौकार मारला. पुढच्या चेंडूलाही हीच दिशा दाखवली. 

दुष्काळात तेरावा महिना म्हणजे दासने उंच मारलेला फटका झेलण्यासाठी तिघे खेळाडू धावले अखेर रोहितच्या हातून झेल सुटला. अखेर दास पंतच्या चपळाईमुळे धावचीत झाला त्याने 29 धावा केल्या पण याच पंतने यष्टीरक्षणात चुक केली तेव्हा तो 15 धावांवर होता. 

पुन्हा चूक टळली 

बांगलादेशचा दुसरा सलामीवीर नईमला वॉशिंग्टन सुंदरने बाद केल्यावर चहलच्या एका षटकांत मुशफिकर रहिम आणि सौम्या सरकार बाद झाले. सौम्याला पंतने यष्टीचीत केले. यावेळीही तिसऱ्या पंचांची मदत घेण्यात आली. पंतने यावेळी चेंडू यष्टींच्या काहीच अगोदर पकडला अन्यथा सौम्याही नाबाद ठरला असता. 
बांगलादेशला 15 षटकांत 4 बाद 112 असे रोखण्यात यश मिळवले होते, परंतु खलिल अहमदचे तिसरे षटक पुन्हा एकदा महागडे ठरले त्याने दोन चौकारांसह 13 धावा दिल्या. 

संक्षिप्त धावफलक - 

बांगलादेश : 20 षटकांत 6 बाद 153 (लिटॉन दास 29 -21 चेंडू, 4 चौकार, मोहम्मद नईम 36 -31 चेंडू, 5 चौकार, सौम्या सरकार 30 -20 चेंडू, 2 चौकार, 1 षटकार, मोहम्मदुल्ला 30 -21 चेंडू, 4 चौकार, दीपक चहर 25-1, वॉशिंग्टन सुंदर 25-1, युझवेंद्र चहल 28-2)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: INDvBAN Bangladesh set a target of 154 in the second T20I