INDvsNZ : भारताकडून न्यूझीलंडला व्हाईटवॉश; प्रथमच जिंकली मालिका

cricket
cricket

तौरंगा : चार बाजूंनी गवताच्या टेकड्या असलेल्या तौरंगाच्या बे ओव्हल मैदानावर पाचवा टी-20 सामन्यात भारताने न्यूझीलंडवर सात धावांनी विजय मिळवीत पाच सामन्यांच्या मालिकेत व्हाईटवॉश दिला. भारताने प्रथमच न्यूझीलंडमध्ये मालिका जिंकण्याची कामगिरी केली आहे. 

भारताचा कर्णधार रोहित शर्माने 60 धावांची खेळी केली. पण डाव्या पोटरीला दुखापत झाली आणि भारताचा धावफलक 163 धावांवर रोखण्यात न्यूझीलंडच्या गोलंदाजांना यश आले. फलंदाजी करताना 3 फलंदाज लवकर बाद झाल्यावर टीम सिफर्ट- रॉस टेलर दरम्यान झालेल्या 99 धावांच्या भागीदारीने न्यूझीलंड संघाला विजयाची शक्यता वाटू लागली होती. पण भारताच्या वेगवान गोलंदाजांनी अजून एकदा कमाल करून 3 बाद 116 धावसंख्येवरून न्यूझीलंडचे 6 फलंदाज बाद करून पाचव्या टी20 सामन्यातही विजयाचा मार्ग शोधून काढला. न्यूझीलंडचे प्रयत्न 9 बाद 156 धावांवर रोखून तौरंगाचा सामना भारतीय गोलंदाजांनी 7 धावांनी जिंकून दाखवला.

पाचव्या सामन्यात विराट कोहलीने विश्रांती घेतल्यावर रोहित शर्मा नाणेफेकीकरता आला आणि लगेच जिंकलाही. रोहितने प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला. संजू सॅमसनने छाप पाडण्याची नामी संधी सलग दुसर्‍या सामन्यात नाकारली. केएल राहुल आणि रोहित शर्माने नेहमीप्रमाणे सहज सुंदर फलंदाजी चालू केली. राहुलच्या बॅटमधून अगदी सहजी मोठे फटके निघत होते. भागीदारी रंगात आली असताना राहुल बॅनेटला झेलबाद झाला.

रोहित शर्माने त्याच्या नेहमीच्या शैलीत अगदी आरामात गोलंदाजांची धुलाई केली. अर्धशतक पार केल्यावर रोहितने आक्रमणाची धार वाढवली. 3 चौकार 3 षटकारांसह 60 धावांवर खेळणार्‍या रोहितच्या डाव्या पोटरीत एकेरी धाव घेताना दुखापत झाली. भारतीय संघाच्या फिजिओने लगेच उपचार केले पण वेदना असह्य झाल्याने जखमी रोहित निवृत्त झाला. धावफलकाला त्या क्षणी लागलेले ब्रेक्स मोठे काम करून गेले. शिवम दुबेची खेळी 5 धावांवर आटोपली. श्रेयस अय्यरने (33 धावा) मनीष पांडेसह भारताचा धावफलक कसातरी 3 बाद 163 धावांपर्यंत फुगवला.

रोहितच्या गैरहजेरीत राहुलने संघाचे नेतृत्व केले. न्यूझीलंड डावाच्या सुरुवातीला तीन धक्के बसले. पहिला मार्टीन गुप्टीलला बुमराने पायचित केले. मोठे फटके मारणार्‍या मुन्रोला वॉशिंग्टन सुंदरने बोल्ड केले आणि ब्रुस धाव पळताना गैरसमजूत झाल्याने धावबाद झाला. 3 बाद 17 धावसंख्येवरून टीम सिफर्ट आणि रॉस टेलरने डाव सावरला. 100 वा टी-20 सामना खेळणार्‍या रॉस टेलरने घणाघाती फटकेबाजी करून तरुण फलंदाज सिफर्टसह संघाला अडचणीतून बाहेर काढले. अर्धशतक केल्यावर सिफर्ट बाद झाला.

बुमराने डेरील मिचेलले अचूक यॉर्कर टाकून बोल्ड केल्याने सामन्यात थोडी चुरस आली. रॉस टेलर अर्धशतक खेळत असल्याने शेवटच्या 4 षटकात 35 धावा जमा करायचे आव्हान मोठे भासत नव्हते. शार्दूल ठाकूरच्या मनात वेगळे विचार होते. शार्दूलने टाकलेल्या 17व्या षटकात त्याने दोन फलंदाजांना बाद केले आणि फक्त 4 धावा दिल्या. समोरून नवदीप सैनीने रॉस टेलरला बाद करून सामना भारताकडे झुकवायला मोठे काम केले. तळातल्या फलंदाजांना षटकामागे 12 धावांच्या सरासरीने विजयाकडे वाटचाल करणे कठीण गेले. जसप्रीत बुमराने टीम साउदीला बोल्ड केल्यावर सामना भारताकडे झूकला. शेवटच्या षटकात 21 धावा करणे कठीण वाटत असताना ईश सोधीने शार्दूल ठाकूरला दोन षटकार ठोकले. पण शार्दूलने शेवटचे दोन चेंडू बरोबर टाकून भारताला 7 धावांनी विजय मिळवून दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com