esakal | IPL 2021: ऋतू बहरला; CSK पुन्हा टॉपला!

बोलून बातमी शोधा

CSK vs SRH

IPL 2021: ऋतू बहरला; CSK पुन्हा टॉपला!

sakal_logo
By
टीम ई सकाळ

IPL 2021, CSKvs SRH : सलामीवीर ऋतूराज गायकवाडने 44 चेंडूत केलेल्या 75 धावा आणि फाफ ड्युप्लेसिसच्या 38 चेंडूतील 56 धावांच्या खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने स्पर्धेतील पाचवा विजय नोंदवला. 6 पैकी 5 विजयासह 10 गुणासह चेन्नईच्या संघाने पॉइंट टेबलमध्ये पुन्हा अव्वलस्थानी मजल मारली. सनरायझर्स हैदराबादने पहिल्यांदा बॅटिंग करताना 3 गड्यांच्या मोबदल्यात निर्धारित 20 षटकात 171 धावा केल्या होत्या. सलामीवीर बेयरस्टो अवघ्या 7 धावा करुन परतल्यानंतर ऑरेंज आर्मीचा कर्णधार डेविड वॉर्नरने 55 चेंडूत 57 धावांची खेळी केली. मनिष पांड्येने 46 चेंडूत 61 धावा करत त्याला उत्तम साथ दिली. या दोघांच्या शतकी खेळीनंतर केन विल्यमसनने 10 चेंडूत 26 आणि केदार जाधवने 1 चेंडूत 12 धावा केल्या. चेन्नई सुपर किंग्जकडून लुंगी एनिग्डीने दोन तर सॅम कुरेनने एक विकेट घेतली.

हेही वाचा: ब्रो तू टेस्ट खेळ IPL नको, बॉलिवूड स्टारचा पंतवर निशाणा

ऋतूराज गायकवाड आणि फाफ ड्युप्लेसीसने चेन्नई सुपर किंग्जच्या डावाची सुरुवात केली. 172 धावांचा पाठलाग करताना ओपनिंग पेयर्सने 129 धावांची भागीदारी करुन हैदराबादला बॅकफूटवर ढकलले. ऋतूराजच्या रुपात राशीद खानने संघाला पहिले यश मिळवून दिले. तो 44 बॉलमध्ये 75 धावांची खेळी करुन परतला. त्याने आपल्या बहरदार खेळीत 12 खणखणीत चौकार खचले. फाफ ड्युप्लेसीस 38 चेंडूत 56 धावा केल्या. मोईन अली 8 चेंडूत 15 धावा करुन परतला. तिन्ही विकेट्स राशीदनेच घेतल्या. रविंद्र जडेजा नाबाद 7 आणि सुरेश रैनाच्या नाबाद 17 धावांसह चेन्नई सुपर किंग्जने 18.3 ओव्हरमध्ये 7 गडी राखून सामना जिंकला. चेन्नई सुपर किंग्जचा स्पर्धेतील हा सलग पाचवा विजय आहे. दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला पराभवाला सामना करावा लागला होता. त्यानंतर चेन्नईच्या संघाने जोरदार कमबॅक करत प्रत्येक सामना जिंकला आहे.

हेही वाचा: IPL Record : जे कुणाला जमलं नाही ते वॉर्नरनं करुन दाखवलं

चेन्नई सुपर किंग्जने 6 पैकी 5 सामन्यातील विजयासह 10 गुण कमावले असून उत्तम सरासरीच्या जोरावर ते पहिल्या स्थानावर आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने देखील 6 पैकी 5 सामने जिंकले असून ते 10 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सने 6 पैकी 4 सामने जिंकले आहेत. मुंबई इंडियन्स 5 पैकी 2 सामन्यातील विजयासह चौथ्या स्थानावर आहे. कोलकाता नाईट रायडर्स, पंजाब किंग्ज, राजस्थान रॉयल्स 4 गुणांसह अनुक्रमे पाचव्या, सहाव्या आणि सातव्या स्थानावर असून हैदराबाद 6 पैकी 1 विजय आणि 5 पराभवासह 2 गुणांसह सर्वात तळाला आहे.