esakal | धोनीनंतर पुणेकर ऋतूराज होऊ शकतो CSK चा सेनापती!

बोलून बातमी शोधा

Ruturaj Gaikwad
धोनीनंतर पुणेकर ऋतूराज होऊ शकतो CSK चा सेनापती!
sakal_logo
By
सुशांत जाधव

महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जला यंदाच्या हंगामातील ओपनिंग मॅचमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर चुकांमध्ये सुधारणा करुन चेन्नईच्या संघाने टॉप गियर टाकत एक्सप्रेसची गती पकडली. मागील पाच सामन्यातील सलग विजयासह चेन्नई सुपर किंग्जचा संघ टॉपला पोहचलाय. सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात धमाकेदार इनिंग करुन लक्षवेधी ठरलेला ऋतूराज पुन्हा एकदा चर्चेत आलाय. चेन्नई सुपर किंग्जच्या विजयात फाफ ड्युप्लेसीससोबत ऋतूराज गायकवाडने मोलाची कामगिरी बजावली होती. आगामी सामन्यात त्याच्याकडून अशाच दमदार खेळीची अपेक्षा आहे.

हेही वाचा: IPL 2021: राहुलने दाखवला क्लास; RCB विरुद्ध खास रेकॉर्ड

सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात मॅन ऑफ द मॅच ठरलेल्या ऋतूराजने भारतीय संघाचा माजी सलामीवीर आणि स्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवाग याला प्रभावित केले आहे. सेहवागने त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केलाय. ऋतूराज हा गडबडीने फटकेबाजी करत नाही. वेळ घेऊन संयमाने तो डावाला आकार देतो. बॅक फूटवरुन फ्रंट फूटवर जात तो सहज फटका मारतो. आपल्या विशेष शैलीमुळे तो सहज धावा करतोय. त्याच्या खेळीत विराट कोहलीची झलक दिसते, असेही विरेंद्र सेहवागने म्हटले आहे.

हेही वाचा: धिप्पाड गेलसमोर काडी पैलवान चहलचा बॉडी बिल्डिंग शो

ऋतूराजने विकेट टाकलेली नाही. तो चांगल्या बॉलवर आउट झालाय. त्याला पडलेल्या बॉलवर विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्ससारखा फलंदाजही बाद झाला असता. फाफ ड्युप्लेसी चांगल्या पद्धतीने खेळत असला तरी ऋतूराज स्ट्राईक रेटच्या बाबतीत त्याच्या एक पाऊल पुढे आहे. जसे जसे गायकवाड मोठी खेळी करेल तस-तशी त्याची दहशत निर्माण होईल, अशी भविष्यवाणीही सेहवागने केलीय. पुढील एक दोन वर्षे तो याच लयीत खेळत राहिला तर महेंद्रसिंह धोनीच्या जागी तोच चेन्नई सुपर किंग्जच्या कर्णधारपदी दिसेल, असेही सेहवागने म्हटले आहे. देशांतर्गत स्पर्धेत खेळताना त्याच्याकडे कर्णधारपदाचा अनुभव असल्याने त्याची दावेदारीही पक्की होईल, असे सेहवागला वाटते.