
Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders : माजी विजेते चेन्नई आणि कोलकता यांच्यात आज होणारा सामना दोघांसाठी वेगवेगळ्या अर्थानि महत्त्वाचा आहे. हा सामना जिंकला तर चेन्नईसाठी प्ले-ऑफ जवळपास निश्चित होणार आहे. मात्र कोलकता संघाचा पराभव झाला तर त्यांचे आव्हान जवळपास संपुष्टात येणार आहे.
चेन्नईचे १२ सामन्यांतून १५ गुण झाले आहेत. त्यांची लढाई पहिले स्थान मिळवून कॉलिफायर सामना खेळण्यासाठी असणार आहे; तर कोलकताचे १२ सामन्यांतून १० गुण झाले आहेत. आजचा सामना गमावला आणि अखेरचा साखळी सामना जिंकला तरी त्यांचे जास्तीत जास्त १२ गुण होऊ शकतील आणि तेवढे गुण प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवण्यास पुरेसे ठरणार नाहीत. त्यामुळे आजचा सामना त्यांच्यासाठी 'करो अथवा मरो' अशाच स्थितीतला आहे.
आयपीएल साखळी सामन्यांच्या या अंतिम टप्प्यात सलग दोन सामने जिंकून धोनीच्या चेन्नई संघाने सातत्य दाखवले आहे. स्वतः धोनी केंद्रस्थानी असला तरी त्याचे इतर सहकारी मॅचविनिंग खेळी करत आहेत. यात डेव्हन कॉन्वे (४२० धावा), ऋतुराज गायकवाड आश्वासक सलामी देत आहेत. त्यानंतर अजिंक्य रहाणे आणि शिवम दुबे डाव उभारणीसाठी मोलाचे ठरत आहेत. धोनी अंतिम षटकांत येऊन टॉप गिअर टाकत आहे. परिणामी चेन्नईची धावसंख्या निर्णायक ठरत आहे. मोईन अली आणि रवींद्र जडेजा या आंतरराष्ट्रीय खेळाडूंकडून निर्णायक योगदान मिळण्याची प्रतीक्षा चेन्नई संघाला आहे.
चेन्नईसाठी तुषार देशपांडे चांगले ब्रेकथ्रू मिळवून देत आहे, तर मथीशा पथिराना निर्णायक क्षणी विकेट मिळवत आहे. मोईन अली, रवींद्र जडेजा आणि महेश तिक्शाना ही फिरकी त्रयी चेन्नईसाठी वरदान आहे. त्यामुळे कोलकता संघात कितीही आक्रमक शैलीचे फलंदाज असले तरी त्यांच्यासाठी यातून मार्ग काढणे सोपे जाणार नाही..
कोलकताकडेही सुनील नारायण, वरून चक्रवर्ती आणि सुयश शर्मा असे फिरकी गोलंदाज आहेत; पण त्यांच्याकडे सातत्याचा अभाव आहे. सुनील नारायणचा फॉर्म हरपलेला आहे. राजस्थानविरुद्ध नितीश राणाने पहिल्या षटकात गोलंदाजी केली आणि यशस्वी जयस्वालने २६ धावा फटकावून सामन्याचा निकालच जवळपास निश्चित केला होता. उद्याच्या सामन्यात गोलंदाजीतील असे अनपेक्षित बदल करण्याचे धाडस कोलकता संघाकडून केले जाणार नाहीत.
फलंदाजी ही कोलकताची भक्कम बाजू राहिली आहे, व्यंकटेश प्रसाद, नितीश राणा, रिंकू सिंग आणि आंद्रे रसेल यांच्यावर त्यांची भिस्त आहे, पण राजस्थानविरूद्ध व्यंकटेशचा अपवाद वगळता इतर सर्व जण अपयशी ठरले होते. आता स्पर्धेतले आव्हान टिकवण्यासाठी सर्वांनी एकत्रित कामगिरी करण्याचे आव्हान कोलकता संघातील खेळाडूंवर असणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.