
GT vs RR : मिलर राजस्थानचा किलर; पहिल्याच हंगामात गुजरात फायनलमध्ये
कोलकाता : गुजारात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा 7 विकेट राखून पराभव करत पहिल्याच हंगामात फायनलमध्ये प्रवेश केला. गुजरातने राजस्थानचे 189 धावांचे आव्हान 19.3 षटकात 3 फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. गुजरातकडून डेव्हिड मिलरने 38 चेंडूत नाबाद 68 धावा चोपत सामना जिंकून दिला. त्याने शेवटच्या षटकात विजयासाठी 16 धावांची गरज असताना सलग तीन षटकार मारत सामना जिंकून दिला. त्याला हार्दिक पांड्याने 40 धावा करून चांगली साथ दिली. (David Miller Back To Back Three Sixes Gujarat Titans Defeat Rajasthan Royals Reached In Final In First Season)
हेही वाचा: Sourav Ganguly | 'प्रत्येकजण माणूसच आहे; चुका होणारच'
राजस्थानचे 189 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या गुजरातला ट्रेंट बोल्टने पहिल्याच षटकात धक्का दिला. त्याने सलामीवीर वृद्धीमान साहाला भोपळाही न फोडता माघारी धाडले.
पहिल्याच षटकात सेटबॅक बसल्यानंतर शुभमन गिल आणि मॅथ्यू वेडने भागीदारी रचण्यास सुरूवात केली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 72 धावांची भागीदारी रचली. मात्र 21 चेंडूत 35 धावा करणारा शुभमन गिल धावबाद झाला. त्यानंतर 30 चेंडूत 35 धावा करणाऱ्या मॅथ्यू वेडला मॅकॉयने बाद करत गुजरातला तिसरा धक्का दिला.
यानंतर कर्णधार हार्दिक पांड्या आणि डेव्हिड मिलर यांनी चौथ्या विकेटसाठी नाबाद अर्धशतकी भागीदारी रचली. या दोघांनी 17 व्या षटकात गुजरातला 150 धावांपर्यंत पोहचवले. या दोघांनी सामना 18 चेंडूत 34 धावा असा आणला. युझवेंद्र चहल टाकत असलेल्या 18 व्या षटकात मिलर आणि पांड्याने 11 धावा केल्या. यामुळे सामना 12 चेंडूत 23 धावा असा आला. मॅकॉयने 19 व्या षटकात फक्त 7 धावा दिल्या. दरम्यान, मिलरने आपले अर्धशतक 35 चेंडूत पूर्ण केले.
आता सामना 6 चेंडूत 16 धावा असा आला होता. प्रसिद्ध कृष्णाच्या पहिल्याच चेंडूवर मिलरने षटकार मारत सामना 5 चेंडूत 10 धावा असा आणला. पुढच्या चेंडूवर देखील मिलरने षटकार मारत सामना 4 चेंडू 4 धावा असा आणला. त्यानंतर मिलरने सलग तिसरा षटकार मारत गुजरातला फायनलमध्ये प्रवेश मिळवून दिला.
हेही वाचा: सचिनचा अर्जुला सल्ला; मार्ग खडतर असणार!
प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थान रॉयल्सने 11 धावांवर आपला पहिला सलामीवीर गमावला. मात्र त्यानंतर जॉस बटलर आणि संजू सॅमसन यांनी भागीदारी रचण्यास सुरूवात केली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 68 धावांची भागीदारी रचली. मात्र साई किशोरने ही जोडी फोडली. त्याने 26 चेंडूत 47 धावा करणाऱ्या संजू सॅमसनला बाद केले.
आक्रमक खेळणारा संजू बाद झाल्यावर सावध फलंदाजी करणाऱ्या जॉस बटलरने आपला गिअर बदलण्या सुरूवात केली. त्याने पडिक्कलला साथीला घेत राजस्थानला शतकी मजल मारून दिली. मात्र पडिक्कलने 20 चेंडूत 28 धावा करत बटलरची साथ सोडली. दरम्यान, बटलरने आपले अर्धशतक पूर्ण केले.
बटलरने अर्धशतकानंतर आपला दांडपट्टा सुरू केला. त्याने शेवटच्या 5 षटकात 60 पेक्षा जास्त धावा ठोकून काढल्या. दरम्यान, हेटमायर (4) आणि रियान पराग (4) हे स्वस्तात माघारी गेले. जॉस बटलरने 56 चेंडूत 89 धावांची खेळी करत संघाला 188 धावांपर्यंत पोहचवले.
Web Title: David Miller Back To Back Three Sixes Gujarat Titans Defeat Rajasthan Royals Reached In Final In First Season
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..