
SRH vs DC : वॉर्नरने हैदराबादला दाखवून दिला दम
मुंबई : दिल्ली कॅपिटल्सने सनराईजर्स हैदराबादचा 21 धावांनी पराभव करत आपला पाचवा विजय साजरा केला. याचबरोबर दिल्ली गुणतलिकेत आता डबल डिजिटमध्ये गेली आहे. दिल्लीने हैदराबादसमोर 208 धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र हैदराबादला 20 षटकात 8 बाद 186 धावांपर्यंतच मजल मारता आली. दिल्लीकडून खलील अहमदने 3 तर शार्दुल ठाकूरने दोन विकेट घेतल्या. फलंदाजीत डेव्हिड वॉर्नरने धडाकेबाज 92 धावा केल्या तर रोव्हमन पॉवेलने 67 धावांचे योगदान दिले. हैदराबादकडून निकोलस पूरनने सर्वाधिक 62 धावा केल्या. त्याला माक्ररमने 42 धावा करून चांगली साथ दिली. डेव्हिड वॉर्नरने पृथ्वी शॉ आणि अक्षर पटेलच्या अनुपस्थितीत दिल्लीची बॅटिंग एकहाती सांभळी. त्याने हैदराबादच्या मॅनेजमेंटला आपला दम दाखवून दिला. (David Warner Shine Delhi Capitals Beat Sunrisers Hyderabad)
हेही वाचा: Rishabh Pant : बाबा जरा जबाबदारीनं खेळ; सेहवागचा पंतला सल्ला
दिल्ली कॅपिटल्सने विजयासाठी ठेवलेल्या 208 धावांचा पाठलाग करताना हैदराबादची पॉवर प्लेमध्येच घसरगुंडी उडाली. अभिषेक शर्मा (7), केन विल्यमसन (4) हे स्वस्तात माघारी गेले. त्यानंतर आलेल्या राहुल त्रिपाठीला देखील फारशी चमक दाखवता आली नाही. त्याची मिशेल मार्शने 22 धावांवर शिकार केली.
अवघ्या 37 धावात तीन फलंदाज माघारी गेल्यानंतर अॅडम माक्ररम आणि निकोलस पूरनने दिल्लीचा डाव सावरला. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी करत संघाला 12 व्या षटकात नव्वदी पार करून दिली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 60 धावांनी भागीदारी रचली.
मात्र ही जोडी खलील अहमदने फोडली. त्याने माक्ररमला 42 धावांवर बाद करत दिल्लीला मोठा धक्का दिला. त्यानंतर आलेला शशांक सिंह 10 तक एबॉट 7 धावांची भर घालून परतला. एकाकी झुंज देणाऱ्या निकोलस पूरनने आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र धावा आणि चेंडू यातील अंतर वाढत चालले होते. अखेर निकोलस पूरनची 34 चेंडूत केलेली 62 धावांची खेळी शार्दुल ठाकूरने संपवली. अखेर दिल्लीने हैदराबादला 20 षटकात 8 बाद 186 धावात रोखले आणि सामना 21 धावांनी जिंकला.
हेही वाचा: खराब संघरचनेमुळे मुंबईची ही अवस्था : जयवर्धने
सनराईजर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करत दिल्ली कॅपिटल्सला पहिल्याच षटकात धक्का दिला. भुवनेश्वर कुमारने दिल्लीचा नवा सलामीवीर मनदीप सिंगला शुन्यावर बाद केले. त्यानंतर मिशेल मार्श आणि डेव्हिड वॉर्नर यांनी भागीदारी रचण्याचा प्रयत्न केला. मात्र ही भागीदारी एबोटने तोडली. त्याने मार्शला 10 धावांवर बाद केले.
यानंतर आलेला कर्णधार ऋषभ पंत देखील 16 चेंडूत 27 धावांची भर घालून माघारी गेला. दरम्यान, डेव्हिड वॉर्नर सेट झाला होता. त्याने डावाची सूत्रे आपल्या हातात घेत रोव्हमन पॉवेल बरोबर चौथ्या विकेटसाठी 122 धावांची दमदार भागीदारी रचली. डेव्हिड वॉर्नरने आपल्या जुन्या फ्रेंचायजीविरूद्ध इर्षेने खेळ करत नाबाद 92 धावा ठोकल्या. तर रोव्हमन पॉवेलने देखील 35 चेंडूत 67 धावांची नाबाद खेळी करून दिल्लीला 20 षटकात 3 बाद 207 धावा उभारण्यास मदत केली.
Web Title: David Warner Shine Delhi Capitals Beat Sunrisers Hyderabad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..