IPL 2024 KKR vs CSK : चेन्नईने रोखला कोलकत्याचा विजयरथ ; ऋतुराजचे दमदार अर्धशतक

कर्णधार ऋतुराज गायकवाडची नाबाद ६७ धावांची अर्धशतकी खेळी आणि रवींद्र जडेजा (३/१८), तुषार देशपांडे (३/३३) व मुस्तफिजूर रहमान (२/२२) यांच्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर चेन्नई सुपरकिंग्सने सोमवारी झालेल्या आयपीएल लढतीत कोलकता नाईट रायडर्स संघावर सात विकेट राखून मात केली.
IPL 2024 KKR vs CSK
IPL 2024 KKR vs CSKsakal

चेन्नई : कर्णधार ऋतुराज गायकवाडची नाबाद ६७ धावांची अर्धशतकी खेळी आणि रवींद्र जडेजा (३/१८), तुषार देशपांडे (३/३३) व मुस्तफिजूर रहमान (२/२२) यांच्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर चेन्नई सुपरकिंग्सने सोमवारी झालेल्या आयपीएल लढतीत कोलकता नाईट रायडर्स संघावर सात विकेट राखून मात केली.

चेन्नईने दोन पराभवांनंतर हा विजय साकारला. कोलकत्याला तीन विजयांनंतर पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागले. कोलकत्याकडून चेन्नईसमोर १३८ धावांचे माफक आव्हान उभे राहिले. वैभव अरोराच्या गोलंदाजीवर राचिन रवींद्र १५ धावांवर बाद झाला. पण कर्णधार ऋतुराज गायकवाड व डॅरेल मिचेल या जोडीने ७० धावांची भागीदारी करीत चेन्नईच्या विजयाची आशा कायम ठेवली. दोघांनी या भागीदारीत नेत्रदीपक फटके मारले. सुनील नारायणच्या गोलंदाजीवर मिचेल २५ धावांवर बाद झाला.

त्यानंतर शिवम दुबेने २८ धावांची आक्रमक खेळी केली. शिवम बाद झाल्यानंतर ऋतुराजने महेंद्रसिंग धोनीच्या (नाबाद १ धाव) साथीने चेन्नईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. ऋतुराजने ९ चौकारांसह नाबाद ६७ धावांची खेळी केली.

दरम्यान, चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. तुषार देशपांडेच्या गोलंदाजीवर फिल सॉल्ट शून्यावर बाद झाला. त्यानंतर मात्र सुनील नारायण व अंगक्रिश रघुवंशी जोडीने ५६ धावांची भागीदारी केली. कर्णधार ऋतुराज गायकवाडने रवींद्र जडेजाच्या हाती चेंडू सोपवल्यानंतर कलाटणी मिळाली. रघुवंशी रिव्हर्स स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्नात २४ धावांवर पायचीत बाद झाला. जडेजाच्याच गोलंदाजीवर नारायण २७ धावांवर माहीश तीक्षणाकरवी झेलबाद झाला. त्यानंतर जडेजाने व्यंकटेश अय्यरला तीन धावांवर बाद करीत कोलकत्याची अवस्था ४ बाद ६४ धावा अशी केली.

IPL 2024 KKR vs CSK
IPL मध्ये 20 व्या षटकात सर्वाधिक धावा काढणारे टॉप-3 क्रिकेटर

कोलकताचा डाव यानंतर सावरला नाही. कर्णधार श्रेयस अय्यर याने ३२ चेंडूंमध्ये ३४ धावांची खेळी केली, पण रमणदीप सिंग (१३ धावा), रिंकू सिंग (९ धावा) व आंद्रे रसेल (१० धावा) या भरवशाच्या फलंदाजांना ठसा उमटवता आला नाही. तुषार देशपांडे व तीक्षणा यांनी मिळून त्यांना बाद केले. कोलकता संघाला २० षटकांत ९ बाद १३७ धावांपर्यंत मजल मारता आली. जडेजाने १८ धावा देत तीन फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. तुषारने ३३ धावा देत तीन फलंदाज बाद केले.

संक्षिप्त धावफलक :

कोलकता नाईट रायडर्स २० षटकांत ९ बाद १३७ धावा (सुनील नारायण २७, अंगक्रिश रघुवंशी २४, श्रेयस अय्यर ३४, तुषार देशपांडे ३/३३, रवींद्र जडेजा ३/१८, मुस्तफिजूर रहमान २/२२) पराभूत वि. चेन्नई सुपरकिंग्स १७.४ षटकांत ३ बाद १४१ धावा (ऋतुराज गायकवाड नाबाद ६७, डॅरेल मिचेल २५, शिवम दुबे २८, वैभव अरोरा २/२८).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com