esakal | IPL 2021 : राहुल vs राहुल कॅचचा झोल, थ्रीडी स्पोर्ट्समध्ये टू डी पिक्चरचा घोळ!
sakal

बोलून बातमी शोधा

KKR vs PBKS

राहुल vs राहुल कॅचचा झोल, थ्रीडी स्पोर्ट्समध्ये टू डी पिक्चरचा घोळ! (Video)

sakal_logo
By
सुशांत जाधव

आयपीएलमधील कोणत्याही लढतीवेळी दमदार सुरुवात करुन सामना शेवटच्या षटकापर्यंत रंगतदार स्थितीत नेण्याची पंजाब किंग्जला जणू सवयच झाली आहे. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात हिच अनुभूती पुन्हा एकदा आली. लोकेश राहुल आणि मयांक अग्रवाल जोडीने धावांचा पाठलाग करताना संघाला चांगली सुरुवात करुन दिली. कर्णधार आणि डावाला सुरुवात करणारा लोकेश राहुल अखेरच्या षटकापर्यंत मैदानात होता. पण सामना कधी पंजाबच्या तर कधी कोलकाताच्या बाजून वळला असे होत अखेर पंजाब किंग्जने पाच विकेट राखून विजय नोंदवला. स्पर्धेतील आपले आव्हान कायम ठेवण्यासाठी सजह जिंकतील असे वाटत असताना त्यांनी सामना शेवटच्या षटकापर्यंत नेला. या सामन्यादरम्यान लोकेश राहुलचा कोलकाता नाईट रायडर्सच्या राहुल त्रिपाठीनं घेतलेल्या झेलची सध्या जोरदार चर्चा सरु आहे.

अखेरच्या दोन षटकात पंजाब किंग्जला 15 धावांची गरज असताना लोकेश राहुलचा एक अप्रतिम झेल राहुल त्रिपाठीनं टिपला. तिसऱ्या पंचांनी बऱ्याचदा रिप्लाय पाहून बॉल जमीनीला टेकल्याचा कोणताही ठोस पूरवा नसल्यामुळे निर्णय फलंदाजाच्या बाजूनं दिला. 19 व्या षटकात शिवम मावीने टाकलेल्या तिसऱ्या चेंडूवर राहुल त्रिपाठीनं अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा नमुना दाखवून दिला. हा कॅच घेत असताना राहुल त्रिपाठीची बोटे ही चेंडू खाली आहेत हे स्पष्ट दिसत होते. पण ही विकेट कोलकाताच्या खात्यात पडली नाही. त्यानंतर राहुल व्यंकटेश अय्यरच्या गोलंदाजीव बाद झाला खरे.... पण तिसऱ्या पंचांनी दिलेल्या निर्णयावर अनेक क्रिकेट समीक्षक नाराजी व्यक्त करत आहेत. ट्विटरच्या माध्यमातून यासंदर्भात प्रतिक्रिया उमटल्याचे पाहायला मिळाले. माजी महिला क्रिकेटर यांनी राहुल त्रिपाठीनं सर्वोत्तम झेल घेतल्याचे ट्विट केले आहे. माझ्यामते ही विकेट होती, असे मत त्यांनी नोंदवले आहे.

हेही वाचा: KKR vs PBKS: शाहरुखच्या षटकारानं पंजाबचा भागंडा!

हेही वाचा: DK चा उलटा-सुलटा फटका; खळी पडणाऱ्या गालावर फुललं हास्य (VIDEO)

थ्रीडी स्पोर्टस टू डी पिक्चरमुळे मोठा घोळ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. माझ्या मते राहुल त्रिपाठीनं उत्तम झेल टिपला होता, असे मत समालोचक अकाश चोप्रा यांनी देखील व्यक्त केले आहे. पंचांनी राहुलला नाबाद कसे काय दिले? असा प्रश्न क्रिकेट अभिनव मुकूंद याने देखील व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर अनेकजण तिसऱ्या पंचांनी दिलेल्या निर्णयावर आक्षेप नोंदवताना दिसते.

अखेरच्या षटकात पंजाब किंग्जला 5 धावांची गरज होती. लॉकी फर्ग्युसन दुखापतग्रस्त असल्यामुळे एक अवांतर फलंदाज घेऊन उतरण्याचा निर्णय इयॉन मॉर्गनसाठी धोक्याचा ठरला. नाइलाजास्तव शेवटचे षटक त्याला व्यंकटेश अय्यरला द्यावे लागले. अय्यरच्या पहिल्या चेंडूवर शाहरुख खानने एक धाव घेत स्ट्राइक लोकेश राहुलला दिले. मोठा फटका मारण्याच्या नादात राहुलने मोक्याच्या क्षणी पुन्हा एकदा विकेट फेकल्याचे पाहायला मिळाले. सामना पुन्हा कोलकाताच्या बाजूनं झुकतोय की काय असे वाटत असताना तिसऱ्या चेंडूवर शाहरुख खानने षटकार मारून संघाला विजय मिळवून दिला. पंजाबने हा सामना 5 विकेट राखून जिंकला.

loading image
go to top