esakal | IPL 2021 Playoffs Race प्रीत 'प्ले ऑफ'ची; उडता पंजाबमुळं मुंबईचा पेपर झाला सोपा, पण...
sakal

बोलून बातमी शोधा

IPL : प्रीत 'प्ले ऑफ'ची; उडता पंजाबमुळं मुंबईचा पेपर झाला सोपा, पण...

IPL : प्रीत 'प्ले ऑफ'ची; उडता पंजाबमुळं मुंबईचा पेपर झाला सोपा, पण...

sakal_logo
By
सुशांत जाधव

IPL 2021 Playoffs Race : आयपीएलच्या 14 व्या हंगामातील स्पर्धेत दोन संघांनी प्ले ऑफमधील आपलं स्थान पक्कं केले आहे. महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जने 18 गुण खात्यावर जमा करत पहिल्यांदा पात्रता सिद्ध केली. पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्सच्या निकालामुळे दिल्ली कॅपिटल्सची स्थान पक्के झाले. कोलकाता आणि पंजाब दोन्ही संघ 12 सामन्यानंतर 5 विजयाच्या जोरावर 10 गुणांसह प्ले ऑफच्या शर्यती कायम आहेत. पंजाबने कोलकाताला पराभूत करुन केवळ आपले स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवले नाही तर त्यांनी 5 विकेट्सनी मिळवलेल्या विजयामुळे दिल्ली कॅपिटल्सचं प्ले ऑफमधील स्थान पक्के झाले. एवढेच नाही तर मुंबई इंडियन्सचा मार्गही त्यांनी थोडा सोयीस्कर करुन टाकला. समजून घेऊयात पंजाबच्या विजयानंतर मुंबई इंडियन्सच्या फायद्याच गणित...

सध्याच्या घडीला गुणतालिकेतील केवळ चेन्नई आणि दिल्ली यांचे स्थान सुरक्षित झाले आहे. तर हैदराबाद हा स्पर्धेतून बाद होणारा एकमेव संघ आहे. उरलेल्या पाच संघातील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, कोलकाता नाईट रायडर्स, पंजांब किंग्ज, मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या, सहाव्या आणि सातव्या क्रमांकवर आहेत.

हेही वाचा: DK चा उलटा-सुलटा फटका; खळी पडणाऱ्या गालावर फुललं हास्य (VIDEO)

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाचे तीन सामने शिल्लक आहेत. यापैकी त्यांना केवळ एका सामन्यात विजय मिळवायचा आहे. प्ले ऑफसाठीच्या उर्वरित दोन संघामध्ये रॉयल चॅलेंजर्स 14 गुणांसह मजबूत स्थितीत आहे. कोलकाता, पंजाब आणि मुंबई या तिन्ही संघाच्या खात्यात 10 गुण जमा आहे. पण पंजाब आणि कोलकाता या संघांनी 12 सामन्यानंतर 10 गुण मिळवले आहेत. जर मुंबई इंडियन्सने उर्वरित 3 सामन्यात विजय नोंदवला तर जर-तरच्या समीकरणातून त्यांची सुटका होईल. जर कोलकाता पंजाबविरुद्ध जिंकले असते तर मुंबई इंडियन्स पुढील तिन्ही सामने जिंकूनही जर-तर आणि नेट रन रेटच्या समीकरणात अडकले असते.

हेही वाचा: IPL 2021 : मै हूं ना...शाहरुखच्या संघाला मिळाला नवा हिरो!

मुंबई इंडियन्सचा पुढील सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणार आहे. दिल्लीने अगोदरच प्ले ऑफमधील स्थान निश्चित केले असून हा सामना मुंबईच्या दृष्टीनेच महत्त्वाचा असेल. मुंबई इंडियन्सचा दुसरा सामना राजस्थान रॉयल्स तर तिसरा सामना स्पर्धेतून बाद झालेल्या सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रंगणार आहे. सध्याच्या घडीला राजस्थानचेही तीन सामने उरले असले तरी त्यांच्या खात्यात 8 गुण आहेत. त्यामुळे मुंबई त्यांच्यापेक्षा वरचढ आहे. तीन सामने जिंकून मुंबईला 16 गुणांपर्यंत मजल मारणे शक्य आहे. बंगळुरु सोडला तर ही संधी प्ले ऑफच्या शर्यतीतीतल अन्य कोणाकडेही नाही.

जर कोलकाता जिंकलं असतं तर...

पंजाब विरुद्ध कोलकाताचा संघ जिंकला असता तर 12 सामन्यानंतर त्यांच्या खात्यात 12 गुण जमा झाले असते. उर्वरित दोन सामने जिंकून ते 16 गुणांपर्यंत पोहचू शकले असते. पण आता ते 14 पेक्षा अधिक गुण मिळवू शकणार नाहीत. पंजाबच्या बाबतीतही तिच गोष्ट आहे. जर पंजाबने आता उर्वरित दोन्ही सामने जिंकले तरी ते 14 गुणांपर्यंतच मजल मारु शकतील. जर राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्ससह अन्य दोन्ही सामने जिंकले तर त्यांनाही 14 गुणांपर्यंत मजल मारता येऊ शकते. या समीकरणात मुंबई इंडियन्सही 14 गुणांवर थांबू शकते. तुर्तास मुंबईचा पेपर पंजाबने सोपा केलाय असेच म्हणावे लागेल.

loading image
go to top