
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सने अक्षर पटेलच्या नेतृत्वात सलग दुसऱ्या विजयाची रविवारी (३० मार्च) नोंद केली आहे. त्यांनी रविवारी झालेल्या १० व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादला ७ विकेट्सने पराभवाचा धक्का दिला.
काव्या मारन संघ मालकिण असलेल्या हैदराबादने पहिल्या सामन्यात विजय मिळवला, पण सलग दुसऱ्या सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे दिल्लीचे आता ४ गुण झाले आहेत, तर हैदराबाद २ गुणांवरच कायम आहे.
रविवारी विशाखापट्टणमला झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने दिल्ली कॅपिटल्ससमोर १६४ धावांचे माफक आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग दिल्लीने १६ षटकात ३ विकेट्स गमावत १६६ धावा करत पूर्ण केल्या. दिल्लीच्या विजयात मिचेल स्टार्क आणि फाफ डू प्लेसिसने मोलाचा वाटा उचलला.