
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत रविवारी (२० एप्रिल) दुपारच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्सला त्यांच्याच घरच्या मैदानात पराभवाचं पाणी पाजलं. मुल्लनपूरला झालेल्या या सामन्यात बंगळुरूने पंजाबला ७ विकेट्सने पराभूत करत हंगामातील पाचव्या विजयाची नोंद केली आहे.विशेष म्हणजे ८ सामन्यांपैकी बंगळुरूने जे ५ सामने जिंकले आहेत, ते सर्व प्रतिस्पर्ध्यांच्या घरच्या मैदानात जिंकले आहेत.
या सामन्यात बंगळुरूने गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि फलंदाजी अशा तिन्ही विभागात पंजाबपेक्षा वरचढ कामगिरी केली. तसेच या सामन्यात विजय मिळवत दोन दिवसांपूर्वीच शुक्रवारी (१८ एप्रिल) पंजाबकडून घरच्या मैदानात झालेल्या पराभवाचा वचपाही काढला.