
IPL New Team Bid : धोनीचे काम पाहणारी कंपनी ठरली अपात्र!
UAE च्या मैदानात एका बाजूला टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेचा थरार रंगला असताना दुसऱ्या बाजूला आयपीएलमधील दोन नव्या संघांची चर्चा सुरु आहे. बॉलिवूड स्टार दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांच्यासह मँचेस्टर युनायटेडवर मालकी हक्क गाजवणाऱ्या ग्लझेर कुटुंबियही संघ खरेदीच्या शर्यतीत आहेत. अदानी ग्रुपसह मँचेस्टर युनायटेडचे मालक शर्यतीत आघाडीवर असल्याचे समजते.
दोन नव्या संघासाठी 10 वेगवेगळ्या कंपन्यांनी खरेदी प्रस्ताव दिला होता. यात माजी कर्णधार महेंद्र धोनीचे काम पाहणारी Rhiti Sports यांनी देखील संघ खरेदी करण्यासाठी उत्सुकता दाखवली होती. मात्र ही कंपनी अपात्र ठरली आहे. धोनीशिवाय ही कंपनी रैना, रविंद्र जाडेजा या क्रिकेटर्ससह सायना नेहवालचेही काम पाहते.
दोन नवीन संघांसाठी 10 कपन्यांनी भाग घेतला होता. यापैकी अदानी ग्रुप, RPSG, हिंदुस्तान टाइम्स मीडिया, ग्लेझर्स आणि अरुबिदों यांनी सर्वात महागड्या बोली लावल्या आहेत. अहमदाबाद, इंदूर आणि लखनौ येथून संघ खरेदी करण्यासाठी मोठी स्पर्धा निर्माण झाल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे.
मँचेस्टर युनायटेडचे मालक सध्या पुढील मोसमासाठी नवीन आयपीएल संघ खरेदी करण्याच्या शर्यतीत सर्वात आघाडीवर आहेत. त्यामुळे त्यांच्या रुपात भारतातील श्रीमंत लीगमध्ये फुटबॉल जगतातील श्रीमंत मालकाची एन्ट्री होणार असल्याचे बोलले जात आहे. एमएस धोनीचे कामकाज पाहणारी कंपनी रिती स्पोर्ट्सनेही आयपीएल संघ विकत घेण्यासाठी उत्सुक होती. मात्र ते बोली लावण्याच्या प्रक्रियेत अपात्र ठरले. कोणत्या कारणास्तव त्यांना अपात्र ठरवण्यात आले हे अद्याप समोर आलेले नाही.