esakal | MI vs RR : मुंबई इंडियन्सला आज अखेरची संधी
sakal

बोलून बातमी शोधा

MI vs RR : मुंबई इंडियन्सला आज अखेरची संधी

MI vs RR : मुंबई इंडियन्सला आज अखेरची संधी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

शारजा : आयपीएलच्या प्लेऑफच्या चार जागांपैकी आता एकच जागा शिल्लक आहे आणि त्यासाठी कोलकता, पंजाब, राजस्थान आणि मुंबई यांच्यात याच क्रमाने शर्यत आहे. मुंबईचा सामना राजस्थानविरुद्ध होत आहे आणि ही गतविजेत्यांसाठी अखेरची संधी आहे. जिंकले तर धुगधुगी कायम राहील, अन्यथा अखेरचा साखळी सामना शिल्लक असला तरी मुंबई संघाचे पॅकअप होईल.

हेही वाचा: VIDEO : बाराव्या खेळाडूमुळे चेन्नईचे वाजले बारा!

सध्याच्या क्रमवारीनुसार कोलकाता चौथ्या स्थानावर आहे आणि त्यांना अधिक संधी असल्याचे चित्र आहे. मुंबई सातव्या क्रमांकावर आहे, आजचा सामना त्यांनी गमावला आणि अखेरचा साखळी सामना जिंकला तर त्यांचे जास्तीत जास्त १२ गुण होतील, पण त्याच वेळी कोलकाता आणि राजस्थान यांचेही १२ गुण असतील. मुळात हे दोन्ही संघ सरासरीत मुंबईपेक्षा पुढे आहेत आणि या दोघांमध्ये त्यांच्यातला अखेरचा साखळी सामना होणार आहे, तो सामना जिंकले तर त्यांचे १४ गुण होतील आणि त्यांना प्लेऑफ गाठता येईल. त्यामुळे मुंबईने त्यांचा अखेरचा साखळी सामना जिंकूनही काहीच फायदा होणार नाही.

आयपीएलचा हा दुसरा टप्पा सुरू झाला, तेव्हा मुंबईचा संघ चौथ्या स्थानावर होता, परंतु बघता बघता पाच सामन्यांपैकी त्यांना एकच सामना जिंकता आलेला आहे. ही परिस्थिती बेजबाबदार फलंदाजीमुळे त्यांच्यावर ओढावली. उद्या राजस्थानविरुद्ध त्यात सुधारणा करावी लागणार आहे.मुंबईकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नावाजलेले फलंदाज आहेत. एक-दोघांनी जरी आपल्या लौकिकानुसार खेळी केली तरी त्यांना मोठ्या धावसंख्येची अपेक्षा बाळगता येईल, पण सर्वच फलंदाजांची अवस्था भरवशाच्या म्हशीला टोणगा अशी झाली आहे.

हेही वाचा: IPL 2021 : पंतला बर्थडे गिफ्ट; CSK ला पराभूत करत DC टॉपला

शारजाच्या संथ झालेल्या खेळपट्टीवर मुंबई इंडियन्सच्या आक्रमक फलंदाजांना कसे वेसण घालायचे याचा सूर प्रतिस्पर्ध्यी संघाला सापडला आहे. काही दिवसांनंतर भारतीय संघात याच अमिरातीत ट्वेन्टी-२० विश्वकरंडक खेळणाऱ्या संघातील ईशान किशन आणि राहुल चहर यांना वगळण्याची वेळ मुंबई संघावर आली आहे. यावरून गतविजेते किती अस्थिर आहेत, हे स्पष्ट होते.हार्दिक पंड्याने पंजाबविरुद्धच्या सामन्यात बऱ्यापैकी आक्रमक फलंदाजी करून विजयात मोलाची कामगिरी केली होती, परंतु लगेचच दिल्लीविरुद्धच्या लढतीत तो अपयशी ठरला होता. दुसऱ्या बाजूला राजस्थान संघाला चांगलाच सूर सापडला आहे. प्लेऑफ निश्चित झालेल्या चेन्नईला त्यांनी तडाखा दिला. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे यशस्वी जैसवाल आणि शिवम दुबे यांनी लाजवाब फलंदाजी केली होती. हे दोघे मुंबईकर उद्या मुंबई इंडियन्ससाठी डोकेदुखी ठरू शकतील.

loading image
go to top