
इंडियन प्रीमियर लीग २०२५ मध्ये दिल्ली कॅपिटल्सने रॉयस चॅलेंजर्स बंगळुरूला त्यांच्याच घरच्या मैदानात एम चिन्नास्वामी स्टेडियमवर गुरुवारी (१० एप्रिल) पराभवाचं पाणी पाजलं. बंगळुरूला पराभूत करण्यासाठी दिल्लीसाठी हिरो ठरला तो लोकलबॉय केएल राहुल.
बंगळुरू आणि विजयाच्या मध्ये केएल राहुल भक्कमपणे उभा राहिला होता. बंगळुरूने दिलेल्या १६४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ५८ धावांवरच दिल्लीने ४ विकेट्स गमावल्या होत्या. यावेळी ट्रिस्टन स्टब्सला साथीला घेत केएल राहुलने नाबाद ९३ धावांची अफलातून खेळी साकारली. त्याने ७ चौकार आणि ६ षटकारांसह ५३ चेंडूत ही खेळी केली. या खेळीसह त्याने १८ व्या षटकातच दिल्लीचा विजय निश्चित केला.