कुलदीप यादवला प्रेमाची गरज; दिल्लीच्या हेड कोचचे मत | Kuldeep Yadav Needs Love | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kuldeep Yadav Needs Love And Positive Environment

कुलदीप यादवला प्रेमाची गरज; दिल्लीच्या हेड कोचचे मत

कुलदीप यादवकडे (Kuldeep Yadav) जबरदस्त प्रतिभा आहे. त्याला एका सकारात्मक वातावरणाची गरज आहे. अशा वातावरणातच त्याची प्रतिभा खुलून येईल. दिल्ली कॅपिटल्समध्ये (Delhi Capitals) त्याला हे वातावरण आणि प्रेम मिळाले आहे असे मत दिल्लीचे हेड कोच रिकी पाँटिंगने (Ricky Ponting) व्यक्त केले.

यंदाच्या आयपीएल हंगामात सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांच्या यादीत कुलदीप यादव हा सध्या दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने 17 विकेट घेतल्या आहेत. मात्र गेल्या काही वर्षापासून कुलदीप हा खराब फॉर्ममधून जात होता. त्यामुळे त्याला भारतीय संघांतील स्थान देखील गमवावे लागले होते. दरम्यान, आयपीएलमध्ये (IPL) त्याची फ्रेंचायजी कोलकाता नाईट रायडर्सनेही (Kolkata Knights Riders) त्याला फारशी साथ दिली नव्हती. गेल्या आयपीएलमधून त्याला गुडघ्याच्या शस्त्रक्रियेमुळे मुकावे लागले होते. मात्र कुलदीप यादवने पुन्हा एकदा आपला फॉर्म मिळवत भारतीय संघात स्थान मिळवले. यापाठोपाठ दिल्ली कॅपिटल्स कडून खेळताना देखील दमदार गोलंदाजीचे प्रदर्शन तो करत आहे.

दरम्यान, कुलदीप यादव बद्दल बोलताना रिकी पाँटिंग म्हणाला की, 'तो आमच्या संघात आला याचा आम्हाला आनंदच झाला होता. लिलावात त्याच्यावर आमचे बारीक लक्ष होते. आम्ही त्याला संघात खूप प्रेम दिले आणि काळजी घेतली. तो एक डावखुरा प्रतिभाशाली फिरकी गोलंदाज आहे. आमच्या संघातील सकारात्मक वातावरणात तो चांगलाच खुलतो आहे.'

पाँटिंग पुढे म्हणाला की, 'आम्ही त्याच्याशी कायम संवाद साधत असतो. त्याच्या बाबतीतील सर्व गोष्टी सुरळीत सुरू आहेत का नाही याची काळजी घेत असतो. त्याचा आत्मविश्वास कुठेही कमी होणार नाही याची खबरदारी घेतो. त्यामुळे आता तो उत्तम गोलंदाजी करत आहे.'