
लिव्हिंगस्टोनला मनमानी कारभार भोवला; कृष्णाने केली शिकार
IPL 2022 : आयपीएलच्या शनिवारी झालेल्या 52 व्या सामन्यात राजस्थानने पंजाब किंग्जचा 6 गडी राखून पराभव केला. राजस्थान रॉयल्सने आयपीएलच्या हंगामात त्यांचा 7वा विजय नोंदवला. यासह हा संघ प्लेऑफच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. यांच्यातला सामना अतिशय रोमांचक असा झाला. सामन्यात एक घटनाही पाहायला मिळाली, जेव्हा फलंदाज तिन्ही स्टंप सोडून खेळू लागला. यामुळे व्यथित झालेल्या गोलंदाजाने पंचांकडे तक्रार केली. पंजाबच्या फलंदाजी दरम्यान ही घटना पाहायला मिळाली.(Prasidh Krishna Argues Liam Livingstone)
राजस्थानचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने पंजाबच्या 19 व्या षटकात गोलंदाजी करत होता. स्ट्राइकवर असलेला लियाम लिव्हिंगस्टोन स्टंपच्या पुढे जाऊन खेळत होता. त्यावर गोलंदाजानी त्याने पंचांकडे तक्रार केली. यावर अंपायरने कृष्णाला नियम समजावून सांगितले आणि गोलंदाजी करण्यास सांगितले. ५व्या चेंडूवर लियामने पुन्हा एकदा तिन्ही स्टंप सोडून फलंदाजी केली, पण यावेळी कृष्णाने तिन्ही स्टंप उडवून लियामला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. या षटकात एकूण 15 धावा झाल्या.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जने 5 गडी गमावत 189 धावा केल्या. इंग्लिश फलंदाज जॉनी बेअरस्टोने 40 चेंडूत 56 धावा केल्या. तर जितेश शर्माने 18 चेंडूत 38 धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थान संघाने 4 बाद 190 धावा करत सामना जिंकला. यशस्वी जैस्वालने 41 चेंडूत 68 धावांची मॅचविनिंग इनिंग खेळली. त्याला सामनावीर म्हणूनही गौरविण्यात आले.