पंजाबला हरवूनही राहुल संतापला; फलंदाजांवर ओरडत म्हणाला, 'मूर्खासारखं...' | KL Rahul Update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 KL Rahul Update

पंजाबला हरवूनही राहुल संतापला; फलंदाजांवर ओरडत म्हणाला, 'मूर्खासारखं...'

IPL 2022 : आयपीएलमध्ये शुक्रवारी, लखनौ सुपर जायंट्सने कमी धावसंख्येच्या सामन्यात पंजाब किंग्जचा २० धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना के. एल. राहुलच्या लखनौ संघाने २० षटकांत ८ विकेट्स गमावून १५३ धावा केल्या, पण पंजाबला या लक्ष्याचा पाठलाग करता आला नाही. त्यामुळे लखनौने हा सामना जिंकला, मात्र कर्णधार के. एल. राहुल खेळाडूंवर नाराज होता, विशेषतः फलंदाजांच्या बाबतीत. राहुलने या विजयाचे संपूर्ण श्रेय गोलंदाजांना दिले.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना लखनौने १३ षटकांत २ विकेट्स गमावून ९९ धावा केल्या. त्यामुळे लखनौ मोठी धावसंख्या उभारेल अशी आशा होती, पण क्विंटन डी कॉक (४६) बाद होताच लखनौची फलंदाजी ढासळली आणि संघाने १३ धावांत ४ विकेट गमावल्या. यामुळे लखनौला केवळ १५३ धावा करता आल्या; मात्र लखनौच्या गोलंदाजांनी आपल्या शानदार गोलंदाजीच्या बळावर पंजाबला १३३ धावांवर रोखले.

‘‘आम्ही बॅटने मुर्खासारखी फलंजाजी केली. आमच्या फलंदाजीच्या क्रमवारीत आम्हाला अनुभव आहे आणि आम्ही त्याचा पुरेपूर फायदा घ्यायला हवा होता. क्विंटन डी कॉक आणि दीपक हुडा यांनी दहाव्या षटकानंतर फलंदाजी करताना डाव चांगल्या प्रकारे हाताळला. या दोघांनी अवघड विकेटवर ९ षटकांत ६० धावा जोडल्या. बाकीच्या फलंदाजांनीही विचारपूर्वक फलंदाजी केली असती तर १८०-१९० धावा सहज झाल्या असत्या. त्यामुळे संघाच्या फलंदाजीबाबत मी निराश झालो आहे,’’ असे लखनौचा कर्णधार राहुल याने सामन्यानंतर म्हटले.

कृणाल पंड्याचे कौतुक

राहुलने संघाच्या गोलंदाजांचे जोरदार कौतुक केले. तो म्हणाला की, ‘‘कृणालने (पंड्या) या संपूर्ण आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्याने किफायतशीर गोलंदाजी केली आहे आणि महत्त्वाच्या वेळी विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय वेगवान गोलंदाजांनी ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, त्याचा आमच्या संघाला फायदा झाला.’’ लखनौसाठी कृणालने ४ षटकांत ११ धावा देत २ विकेट घेतल्या. त्याच वेळी मोहसीन खानने ४ षटकांत २४ धावा देत ३ फलंदाज बाद केले. दुष्मंता चमिरानेही दोन विकेट घेत आपली चमक दाखवली.