
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत रविवारी (२० एप्रिल) मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्सला ९ विकेट्सने पराभूत करत चौथ्या विजयाची नोंद केली. वानखेडे स्टेडियमवर हा सामना झाला होता. मुंबई इंडियन्सच्या या विजयात सलामीवीर रोहित शर्माने मोलाचा वाटा उचलला. त्याला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला.
चेन्नईने दिलेल्या १७७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून सलामीला फलंदाजीला उतरला होता. त्याने आधी रायन रिकल्टन सोबत पहिल्या विकेटसाठी ६३ धावांची भागीदारी केली.
रिकल्टन २४ धावांवर बाद झाल्यानंतर त्याला सूर्यकुमार यादवने तोलामोलाची साथ दिली. या दोघांनी नंतर नाबाद ११४ धावांची भागीदारी करत १७७ धावांचे लक्ष्य गाठून देत मुंबईचा विजय १६ व्या षटकातच निश्चित केला.