
पुणे : आयपीएलचा 15 वा हंगाम (IPL 2022) हा आता एका रंजक स्थितीत पोहचला आहे. मुंबई सोडून सर्व संघात प्ले ऑफमध्ये सामील होण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. दरम्यान, आज चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) रॉयल चॅलेंजर बेंगलोर विरूद्ध भिडणार आहे. जाणकारांच्या मते हा सामना अत्यंत चुरशीने खेळला जाईल. चेन्नईचे नेतृत्व पुन्हा एकदा महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) हातात आले आहे. याचबरोबर सीएसके विनिंग ट्रॅकवर देखील परतली आहे. तर तिकडे आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहली देखील फॉर्ममध्ये परतत आहे. त्यामुळे आजचा सामना हा रंगतदार होणार आहे.
दरम्यान, भारताचे माजी कर्णधार सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) यांना विश्वास आहे की सीएसकेला जरी मोठा पल्ला गाठायचा असला तरी ते प्ले ऑफच्या स्पर्धेत अजूनही आपली दावेदारी सांगू शकतात. गावसकर स्टार स्पोर्ट्सच्या कार्यक्रमात बोलताना म्हणाले की, 'त्यांना अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. मात्र या संघाला कसा कमबॅक (Come Back) करायचा हे माहिती आहे. मात्र आता त्यांना आपल्या कमगिरीत त्वरित सुधारणा करावी लागले.'
ते पुढे म्हणाले की, 'आपण गेल्या हंगामात केकेआर (KKR) बाबत काय झाले ते पाहिले आहे. ज्यावेळी गेल्या हंगामाचा पहिला भाग भारतात झाला त्यावेळी केकेआर कोठेच दिसत नव्हती. त्यांची कामगिरी अत्यंत सुमार होती. पण, ज्यावेळी हंगामाचा दुसरा भाग युएईमध्ये झाला त्यावेळी त्यांनी जवळपास प्रत्येक सामना जिंकून फायनल गाठली. त्यामुळे या स्पर्धेत गोष्टी अचानक बदलू शकतात.'