अँजिओप्लास्टीनंतर कपिल देव यांच्या प्रकृतीत सुधारणा, चेतन शर्मांनी शेअर केला फोटो

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 24 October 2020

कपिल देव यांना शुक्रवारी अचानक छातीत वेदना जाणवू लागल्याने दिल्लीतील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

नवी दिल्ली- भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार, विश्वविक्रमवीर कपिल देव यांना शुक्रवारी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांच्यावर त्वरीत अँजिओप्लास्टी करण्यात आली. कपिल देव यांच्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे. कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली खेळलेले त्यांचे जुने सहकारी क्रिकेटपटू चेतन शर्मा यांनी टि्वट करुन याची माहिती दिली आहे. त्यांनी कपिल देव यांचा हॉस्पिटलमधील फोटो टि्वटसोबत जोडला आहे. 

1983 च्या विश्वचषकात हॅटट्रीक घेणारे चेतन शर्मा यांनी टि्वटमध्ये म्हटले की, 'शस्त्रक्रियेनंतर कपिलपाजी आता ठीक आहेत. त्यांची मुलगी आमयाबरोबर ते बसले आहेत. जय मातादी.'

हेही वाचा- IPL 2020 : लायन विल रोअर अगेन!

कपिल देव यांना शुक्रवारी अचानक छातीत वेदना जाणवू लागल्याने दिल्लीतील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. 'कपिल देव यांना हृदयविकाराचा झका आला होता. तपासणी करण्यात आल्यानंतर त्यांच्यावर त्वरीत अँजिओप्लास्टी करण्यात आली. कपिल देव यांची प्रकृती आता स्थिर असून काही दिवसातच त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल,' असे निवेदन हॉस्पिटलने दिले होते. 

माजी अष्टपैलू खेळाडू कपिल यांनी टि्वट करुन सर्वांचे आभार मानले. 'तुम्हा सर्वांचे प्रेम पाहून मला खूप आनंद झाला. मी तुमचा आभारी आहे. आता माझी प्रकृती सुधारत आहे,' असे त्यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले. 

हेही वाचा- Bihar Election: 10 लाख सरकारी नोकऱ्या, कर्जमाफी, बेरोजगारी भत्ता; तेजस्वींचीही आश्वसनांची खैरात

कपिल देव यांनी 1978 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल टाकलं होतं. त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत 131 कसोटी सामने खेळले. कपिल देव यांनी न्यूझीलंडच्या रिचर्ड हॅडली यांचा सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम मोडला होता. त्यांनी एकूण 434 विकेट घेतल्या आहेत. भारताकडून सर्वाधिक कसोटी बळी घेण्याच्या यादीत अनिल कुंबळे यांच्यानंतर कपिल देव यांचे नाव आहे. कसोटीत त्यांच्या नावावर 5 हजारांहून जास्त धावा आहेत. यात 8 शतकांचा समावेश आहेत. तसंच 225 एकदिवसीय सामन्यांमध्ये  त्यांनी 253 गडी बाद केले होते. 

भारताने आयसीसीचा पहिला वर्ल्ड कप कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली जिंकला होता. वेस्ट इंडिजसारख्या बलाढ्य संघाला नमवून 1983 मध्ये कपिल देव यांच्या संघाने इतिहास रचला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kapil dev recover after heart surgery says former cricketer chetan sharma